अजित जगताप
Satara News| सातारा : सध्या राजकीय नेत्यांच्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व देण्याची स्पर्धा काही कार्यकर्ता कम ठेकेदार यांच्यामध्ये लागली आहे. त्यातूनच मग नेत्यांच्या शिफारशीवरून कामे घ्यायची ती निकृष्ट दर्जाची करायची आणि पुन्हा त्या नेत्याचे गावभर कौतुक करायचे. असा ट्रेंड साताऱ्यात सुरू झालेला आहे.
नवीन रस्त्यात पडले ‘खड्डे’ तरी भ्रष्ट ठेकेदार करतात नेत्याचे ‘बर्थडे’अशी अवस्था पाहण्यास मिळत आहे. याला काही अधिकारी ही जबाबदार असल्याचे दिसून आले आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यामध्ये चौदाशे वाड्या- वस्ती, गावे आहेत. सातारा जिल्हा नियोजन मंडळ, डोंगरी विकास निधी, आमदार-खासदार निधी, पुनर्वसन निधी, तसेच पंधरावा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना, अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना, इंदिरा आवास योजना, रमाई योजना,पेयजल, अशा अनेक योजनेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकार निधी देते. या निधीवर डोळा ठेवून काही व्यावसायिक कार्यकर्ते व मजूर सोसायटीच्या माध्यमातून अशी निकृष्ट कामे करून अक्षरशा सातारा जिल्ह्यात आर्थिक लचके तोडणारी संघटित टोळी कार्यरत झाली आहे. अशी चर्चा होताना दिसत आहे.
ठेकेदारांमुळेच रस्त्याची अवस्था बिकट…
सातारा जिल्हा म्हणजे व्यावसायिक ठेकेदारांसाठी आंदण म्हटलं तरी चालेल जशा पद्धतीने बिनभोभट आरक्षण आहे. आरक्षणाचा लाभ त्या जातीतील लोकांनाच मिळतो. अशा पद्धतीने आता ठेकेदारांची एक जात झाली असून नेत्याचे कौतुक करायचे व निकृष्ट दर्जाचे काम करायचे. अशा ठेकेदारांमुळेच रस्त्याची अवस्था बिकट होत आहे.त्यामुळे प्रामाणिक ठेकेदार नाहक बदनाम होऊ लागले आहेत.
सातारा जिल्ह्यातील पाटण, कराड, खटाव, माण, जावळी, सातारा, खंडाळा, महाबळेश्वर ,वाई, सातारा तालुक्यात खासदार व आमदारांच्या मर्जीतील ठेकेदारांनी आपले चांगलेच उखळ पांढरे केले आहे. अशी चर्चा होताना दिसते पण, कोणतीच ठोस कारवाई होत नाही. काही प्रसार माध्यमातून आवाज उठवला तर दरवाढ होते. पुन्हा जैसे थे परिस्थिती होऊन जाते. असा समज मतदारसंघात बनला आहे.
नवीन तयार केलेल्या ‘रस्त्यावर जरी पडले खड्डे, तरी भ्रष्ट ठेकेदार नेत्याचे साजरे करतात ‘बर्थडे’ अशी आता नवीन म्हणी तयार झालेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पूर्वी प्रामाणिक अधिकारी होते. स्वतः रस्त्याच्या कामाची पाहणी करून मूल्यमापन करीत होते. संबंधित ठेकेदार व शाखा अभियंता उपअभियंता यांना सूचना करत होते.
आता डांबरीकरण फक्त फलकावर दिसत असून रस्त्यावर मात्र, खडी दिसत आहे. त्यामुळे एका पावसातच या रस्त्याची वाट लागलेली पाहण्यास मिळते. सध्या ठेकेदार हे नेत्याच्या वाढदिवसाच्या निधीसाठी निकृष्ट रस्त्याचे विकास कामे करतात. याची कल्पना काही नेत्यांना आहे .पण, आपलेच दात आणि आपलेच ओठ कशाला ठेकेदारांच्या उत्पादनात खोट? असा विचार काही नेते व त्यांचे दलाल करत आहेत.याबाबत साधी कधी चर्चा होताना दिसत नाही.
सध्या राजकीय परिस्थिती बिकट झाल्यामुळे अधिकारी वर्गाचे चांगलेच फावले आहे. सातारा जिल्हा परिषद, दहा पंचायत समिती व बांधकाम विभागात भ्रष्ट अधिकाऱ्याच्या केबिन बाहेर ठेकेदारांची गर्दी बऱ्याच गोष्टी सांगत असतात. टक्केवारीच्या घोळात सातारा जिल्ह्यातील प्रामाणिक पणाची ही टक्केवारी घसरत आहे. याचे उदाहरण म्हणजे काही ठेकेदार आयोजित ‘बर्थ डे’चा कार्यक्रम घेतला जातो. त्यासाठी नामांकित नर्तिका, ऑर्केस्ट्रासाठी दीड दोन लाखाची सुपारी दिली जाते. सदरचा पैसा हा ठेकेदारीच्या ठेकेदारीतूनच आल्याने रस्त्यावरील ‘खड्डेखतरा’ हा ‘दीप’ लावून पाहण्यासारखाचं झाल्याचे बोलले जात आहे.
पूर्वीच्या काळी आणि आता ही काही नेते ‘बर्थ डे’ साजरे करीत होते .खासदार-आमदार स्वतःच्या पैशातून विधायकपणे वाढदिवस व चांगले उपक्रम राबविण्यात पुढाकार घेत होते. आता काही कार्यकर्ते इतरांकडून खंडणी गोळा करूनच तर ठेकेदार मर्जी राखण्यासाठी असे ‘बर्थ डे’ साजरे करतात. ही काळाची महिमा असून नवीन रस्त्यात खड्डे पडले.
प्राथमिक शाळेची फरशी निघाली, गटारे उध्वस्त झाले. पाण्याची पाईप सतत फुटली. सार्वजनिक सभा मंडप गळू लागले तर जाब कोणाला विचारणार? असा मार्मिक प्रश्न प्रामाणिक कार्यकर्ते व मतदार विचारू लागले आहेत. याचे ही भान राहिलेले नाही अशी ही ‘साताऱ्याची तऱ्हा’ झाली असून प्रामाणिकपणाची बुगडी सांडली असून ती सापडणे दुरापास्त झाली आहे.