अजित जगताप
(Satara) वडूज : खटाव तालुक्यातील वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाजार समिती निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे पूजन करण्यात आले, कसे महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रचारा सुरुवात केली.
संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, सूर्यकांत भुजबळ, जिल्हाध्यक्ष श्रीकांत लावंड, दत्तू घार्गे, तानाजी देशमुख, सूर्यभान जाधव, शरद खाडे, सचिन पवार, संतोष तुपे यांच्यासह बाजार समिती निवडणुकीतील उमेदवार, गावच्या शाखेचे पदाधिकारी कटगुण ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या वतीने हनुमंतराव गायकवाड यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा स्वागत सत्कार केला.
वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली…!
शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरीच निवडून गेले पाहिजेत. असा आग्रह धरत वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला कोणताच राजकीय पक्ष वाली राहिलेला नाही, भविष्य काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना या शेतकऱ्यांना आपल्या हक्काची वाटेल असं काम करवून दाखवू असे युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख म्हणाले.
शेतकऱ्यांचे पैसे अडकले, मालाचा लिलाव होत नाही, अशावेळी अनेकदा वडूज बाजार समितीमध्ये संघटनेने आंदोलन करून शेतकऱ्यांना फायदे मिळवून दिले आहेत. या बाजार समितीमध्ये वाईट चालीरीती आणि प्रथा बंद करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते निवडून देण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष दत्तू घार्गे, सूर्यभान जाधव यांनी केले.
यावेळी संघटनेचे उमेदवार सुदाम लावंड, युवराज पवार, संतोष तुपे, सत्यवान गलांडे, काकासाहेब सजगणे, सुभाष जाधव, बापुसो पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, वडूज शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाल्यास बरे वाटले असते, असे कोरेगाव -खटावचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठी खटाव विकास आघाडी होत असेल तर स्वागत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.