सांगली : वंजारवाडी (ता. तासगाव) गावात नूतन सरपंच अरुण खरमाटे यांनी सरपंचपदाचा कार्यभार ‘मुख्यमंत्री स्टाईल’ने स्वीकारला. सरपंच, उपसरपंचासह नऊ सदस्यांनी शपथ घेत पदभार स्वीकारला. खरमाटे यांच्या अनोख्या पद्धतीने पदभार स्वीकारलेल्या सोहळ्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु आहे. त्यामुळे गावातील सरपंचांचा शपथविधी सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
सरपंचपदावर विराजमान झालेले अरुण खरमाटे, उपसरपंच बाजीराव खरमाटे यांचा पदग्रहण सोहळा अगदी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी पद्धतीने पार पडला. निवडणूक निर्णय अधिकारी रणधीर पाटील यांच्या उपस्थितीत कर्तव्याची शपथ घेण्यात आली.
सरपंचपदाचे वाढलेले अधिकार व यंदाच्या निवडणुकीत निवडणूक चुरशीची झाली. यात जे सरपंच झाले, त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना गावचा मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत आहे, त्याचा प्रत्यय गुरुवारी तासगाव तालुक्यातील वंजारवाडीत आला.
चौकट : गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतंय…!!
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांच्या शपथविधीसारखा सरपंच उपसरपंच व नऊ सदस्यांचा शपथविधी पार पडला. या सोहळ्यानंतर सरपंच खरमाटे भाषणात म्हणाले, ‘होय, मला गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे. वंजारवाडी गावातील सरपंचांचा शपथविधी सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.