लोणी काळभोर- मांजरी खुर्द (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे सरपंच निखील उत्तम उंद्रे यांना सरपंचपदावरुन हटविण्याबरोबरच, त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते. मात्र, या आदेशाला महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव नीला रानडे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा मांजरी खुर्दच्या सरपंचपदाचा कारभार निखील उंद्रे स्वीकारणार आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप उंद्रे यांनी २२ मार्च २०२१ रोजीच्या मांजरी खुर्द ग्रामपंचायतीच्या मासीक सभेत, नियमबाह्य ठराव झाल्याचे व त्या ठरावाला सरपंच निखील उंद्रे सुचक व अनुमोदक असल्याबाबतची तक्रार केली होती. यात निखील उंद्रे दोषी आढळल्याने, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी निखील उत्तम उंद्रे यांना सरपंचपदावरुन हटविण्याबरोबरच, त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले होते.
याप्रकरणी निखील उंद्रे यांनी ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यानंतर मंत्री (ग्रामविकास) यांनी विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्या दि. १२.०९.२०२२ रोजीच्या आदेशाला स्थगिती आदेश दिला आहे. या आदेशाला स्थगिती महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव नीला रानडे यांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख आपणास लवकरच कळविण्यात येईल.तसेच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरचे स्थगिती पत्र संबंधितांना तात्काळ लेखी पोच करण्याची व्यवस्था करावी. अशाही सुचना या आदेशात रानडे यांनी दिल्या आहेत.