हिंगोली : 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भरचौकात फाशी घेईल, असे चॅलेंज संतोष बांगर यांनी दिलं आहे. त्यामुळे आता त्यांनी स्वतःच दिलेल्या चॅलेंजमुळे चर्चेत आले आहेत. हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.
आमदार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले तेव्हापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडत आहेत. पण आता संतोष बांगर वादात नाहीत, तर चॅलेंजमुळे चर्चेत आले आहेत. याआधीही त्यांनी मिशी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं. ते चॅलेंज त्यांच्या चांगलचं अंगलटी आलं होतं. त्यावेळी त्यांची चर्चा झाली होती. आता मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर फाशी घेईल, असे बांगर म्हणाले आहेत.
भर चौकात फाशी घेण्याचं चॅलेंज
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत. तसे झाले नाही तर स्वतः भर चौकात फाशी घेणार असल्याचे चॅलेंज आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे. संतोष बांगर यांच्या नव्या चॅलेंजची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कळमनुरी बाजार समितीमध्ये सत्ता न आल्यास मिशी कापेल, असे चॅलेंज संतोष बांगर यांनी काही महिन्यांपूर्वी दिलं होतं. पण निवडणुकीनंतर येथे महाविकास आघाडीची सत्ता आली. या निवडणुकीच्या प्रचाराची राज्यभर चर्चा झाली होती. आमदार बांगर यांनी या निवडणुकीवरुन चॅलेंज दिले होते. “या पॅनेलच्या सर्व जागा निवडून नाही आल्या तर मिशी ठेवणार नाही, असं आमदार संतोष बांगर म्हणाले होते. त्यावेळीही त्यांची जोरदार चर्चा झाली होती.
संतोष बांगर यांच्या वादाची लिस्ट
- 26 जून 2022 शिवसेनेसोबत बेईमानी करणाऱ्यांच्या बायका त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्यांची मुले अविवाहित मरतील या विधानानंतर वाद झाला होता.
- 17 जुलै 2022 गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा या विधानानंतर मोठा वाद झाला.
- 15 ऑगस्ट 2022 मध्यान भोजन योजनेतील जेवण पुरवठा करणाऱ्या गोडाऊन मधील व्यवस्थापकास मारहाण केली.
- 14 ऑक्टोबर 2022 पिक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड कृषी अधीक्षकाला शिवीगाळ आणि धमकावलं .
- ऑक्टोबर 2022 हॉस्पिटलच्या बिलावरून एका डॉक्टरला फोनवरून धमकी दिल्याचे ऑडियो क्लिप व्हायरल झाली. इतकेच काय तर ठाकरे गटात असताना आमदार संतोष बांगर यांनी नारायण राणे यांचा कोथळा बाहेर काढण्याची धमकी दिली होती.
- 4 नोव्हेंबर मंत्रालयातील पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.