पुणे : शरद पवार साहेब या देशाच्या राजकारणातील भीष्मपितामह आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर असे बोलून महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घातली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात उभी केली आहे. फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होतं. पण ते फिदीफिदी हसत होते, टाळ्या वाजवत होते, तुम्ही कधीतरी या राज्याचे मुख्यमंत्री होता आणि आमच्या पाठिंबावर मुख्यमंत्री होतात, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महायुतीच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. सदाभाऊ खोत यांच्या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी स्वतःचा चेहरा पाहावा. शरद पवार हे देशाचे सर्वोच्च नेते आहे. शरद पवार साहेबांचं बोट पकडून आम्ही कसं राजकारण केलं हे सुद्धा मोदी यांनी सांगितलं आहे. भाजप सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. पवार साहेबांनी काहीच केलं नाही असे हे म्हणत आहेत. त्यांनी त्यांच्या गेल्या 60-70 वर्षातील कामाचा लेखाजोखा पाहावा आणि आपण नेमकं या राज्यासाठी काय योगदान दिलं आहे, याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने आत्मचिंतन करावं, असा हल्लबोल त्यांनी केला आहे.
सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले…
शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणाला, पण येवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे…मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा…महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे काम कोणी केले असेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी…असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.