मुंबई : विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. निवडणुकीची मतमोजणी आणि निकालापूर्वी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य करत म्हणाले, ”मुख्यमंत्री पदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. काँग्रेसचे प्रमुख नेते दिल्लीतून महाराष्ट्रात येतील. त्यांना मँडेट घेऊनच येथे यावं लागेल. शरद पवार मुंबईत असतात, उद्धव ठाकरेही मुंबईतच आहेत. आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ. नाहीतर भाजपाचे लोक आमच्या हातातील ताट खेचायचा प्रयत्न करतील, एवढे ते निर्घृण लोक आहेत.”
संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी माध्यमांनी त्यांना एक्झिट पोलसंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, मतदान गुप्त असल्याचे सर्वांना माहीत असतानाही काही लोक उपद्व्याप करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा संशोधनाचा विषय आहे. पोलनुसार भाजपने लोकसभा निवडणुकीत 400 चा आकडा पार केला असेल. हरयाणातील परिस्थिती वेगळी दिसत होती, पण तिथे काय झाले? याचा दाखलाही संजय राऊत यांनी यावेळी दिला.
‘आम्ही जर 160 जागांवर जिंकत असू तर मग एक्झिट पोल कोणी केले. कुठल्या तरी कंपन्या येतात. काहीतरी एक्झिट पोल करतात. आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. आम्ही 26 नोव्हेंबरला सरकार स्थापन करणार आहोत, असा दावाही संजय राऊत यांनी केला.