संभाजीनगर (औरंगाबाद) : खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असून ते शिवसेना पक्ष कसा संपेल यांची पद्धतशीर मांडणी करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना केला.
शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे चालवतच नाहीत. ते राष्ट्रवादी चालवत आहेत, आणि संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. माध्यमांनी खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, हा गैरसमज डोक्यातून काढावा. शिवसेना पक्ष कसा संपेल यांची पद्धतशीर मांडणी संजय राऊत करत आहेत, असा म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.
“जेव्हा शिवसेना संपेल, तेव्हा संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील,” असे म्हणताना शिरसाटांनी संजय राऊतांवर टीका केली.
भाजपा आणि शिंदे गटाने दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एयू या कोडचा उल्लेख करत शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी सुसाईड नोटमध्ये असलेल्या ईएस कोडवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. आता या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले.
“खासदार विनायक राऊत किंवा खासदार संजय राऊत यांना रोज एक विषय पाहिजे असतो. यांना पक्षाचे काहीच देणेघेणे नाही. पक्ष संपत असल्याची त्यांना चिंता नाही. आरोपांच्या फैरी झाडण्यात त्यांना रस आहे. ते अडीच वर्षे सत्तेत होते. अडीच वर्षाच्या काळात ईएस कोण, डीएस कोण किंवा आणखी कोण याबद्दल त्यांनीच चौकशी करायला पाहिजे होती’ असे म्हणत संजय शिरसाट यांनी पुन्हा ठाकरे गटाच्या नेत्यांना कटघऱ्यात उभे केले.