Sanjay Raut मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशाप्रकारचे अनेकवेळा दावे प्रतिदावे सुद्धा अनेकांकडून केले जात आहे. मात्र याला अजित पवार यांनी दुजोरा न देता ह्या सर्वा अफवा असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान आज पुन्हा एकदा पवार नारज असल्याच्या चर्चा रंगल्या. त्याचे कारणही तसेच. पवार यांनी पुण्यातील त्यांचे कार्यक्रम रद्द केले व सकाळपासून ते नॉटरिचेबल झाले. दरम्यान नाराज पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेचा उधान. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले…!
”अजित पवार काल आमच्याबरोबर होते. नागपुरातल्या सभेसाठीही ते होते. त्यांचा काल आमच्याबरोबर चांगला संवाद होता. नागपुरातून मुंबईला येताना अजित पवार आमच्याच विमानात होते. मला अजिबात वाटत नाही की अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडून वेगळ्या दिशेने जातील. एकंदरीत त्यांच्या भूमिका परखड आहेत. ते स्पष्ट बोलतात. काल रात्री ते स्वत: उद्धव ठाकरेंसमवेत नवी मुंबईतील रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करत होते” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी माध्यमांना दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे आमदार सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवल्यास भाजपने प्लॅन बी तयार ठेवल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादीतील नाराज आमदारांचा गट बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असून ते भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.