(Rupali Patil) पुणे : शिवसेनेचे (शिदे गट) आमदार संजय शिरसाट यांची ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या टीका करताना जीभ घसरली होती. त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर अंधारे यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर अंधारे या चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी शिरसाटांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जशास तसे प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर हे प्रकरण शांत होईल, असे वाटले होते. मात्र अंधारे या संतापलेल्याच आहेत. या प्रकरणात आता राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी उडी घेतली आहे.
पाटील म्हणाल्या, ”सुषमाताई प्रत्येकाशी बोलत असताना भाऊ, दादा अशी संबोधने लावतात. कारण त्या एका चांगल्या घरातून आणि चांगल्या संस्कारातून आलेल्या आहेत. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वाचे अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत संस्कार दिसतात. ज्याची सध्या पातळी घसरलेल्या राजकारणात वाणवा आहे.”
संजय शिरसाट आत्ता जिथे आहेत तिथे असणारे पुरुष राजकारणी हे कायम महिलांबद्दल अत्यंत असभ्य भाषेत बोलतात. मग ते अब्दुल सत्तार असतील किंवा गुलाब पाटील असतील .या नेत्यांकडून गलिच्छ भाषा आणि शब्दप्रयोग केला जातो. त्यामुळे शिरसाट यांना चांगलं बोलायची आणि चांगले ऐकायची मुळात सवयच नाही. असे पाटील म्हणाल्या..
रुपाली पाटील यांचे शिरसाटांना प्रश्न..
– व्हाया सुरत गुवाहाटी टूर करणाऱ्या संजय शिरसाटांकडे 72 कोटी रुपयांची रक्कम घरी कशी काय आली ? या ७२ कोटी रुपयांतून शिरसाट यांना ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपये मागणारी त्यांच्या जीवाभावाची बाई कोण होती?
– दोन अडीच महिन्यांपूर्वी संजय शिरसाट यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने एअर ॲम्बुलन्सने संभाजीनगरवरून मुंबईला नेण्याचे फार मोठे नाटक झाले. हे अटॅक प्रकरण नेमके काय होते ?
– संभाजीनगरमध्ये पाटील नावाच्या व्यक्तीला संजय शिरसाट का बर अडकवू पाहत होते ? या पाटीलचा काय संबंध होता म्हणून संजय शिरसाट हे आपली सगळी ताकद पणाला लावत होते?
– अगदी आठच दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईमध्ये ७२व्या मजल्यावर संजय शिरसाटांनी कुणासाठी कोट्यावधीचा फ्लॅट घेतला ज्याची त्यांनी सत्यनारायण पूजा करण्यासाठी काही पत्रकारांनाही आमंत्रित केले होते.