दौंड – दौंड ते बारामती एसटी बस शटल फे-या बंद असल्यामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थी, जेष्ठ नागरीक,शेतकरी, व्यवसायिक प्रवाशांची गैर सोय होत आहे. या वर उपाय म्हणून पूर्वी प्रमाणे दर अर्ध्या तासाला शटल बस सेवा चालू करावी अशी मागणी दौंड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरेश ओझा यांनी महाव्यवस्थापक ( वाहतूक ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यलय मुंबई यांना लेखी पत्राद्वारे मंगळवार (ता. २ ) रोजी केली आहे.
पत्रामध्ये म्हंटले आहे की, दौंड – बारामती एसटी बस शटल कोरोना काळापासून बंद करण्यात आल्या आहेत. त्या बस अद्याप चालू करण्यात आलेल्या नाहीत. बारामती व दौंड ला शिक्षणा करिता कॉलेज ला जाणाऱ्या चोरमले वस्ती, मोरेवस्ती, भागवतवस्ती, जिरेगाव, जाधववस्ती, भंडलकरवस्ती, लाळगेवाडी, गुंजखीळा, खरोडेवाडी, सिरसुफळ, उंडवडी या गावातील विद्यार्थ्यांनची संख्या जास्त आहे.
परंतु, गाड्या बंद असल्यामुळे खाजगी वाहनातून किंवा मोटारसायकलवर प्रवास करावा लागत आहे. यामुळे विदयार्थ्याचे, प्रवाशांचे हाल होत आहेत. दौंड आगारामध्ये विचारणा केली असता बाहेरून येणा-या गाडया आहेत असे उत्तर दिले जाते परंतु त्या गाड्या लांब रूटच्या असल्यामुळे वरील पैकी कुठल्याही स्टॉपवर थांबत नाही. दौंड आगाराने तालुक्यातील प्रवाशांची सोय करणे गरजेचे असताना, मात्र लांब ठिकाणच्या बस चालवल्या जातात.या मुळे दौंड तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
या वर उपाय म्हणून दौंड-बारामती पूर्वीप्रमाणे प्रत्येक अर्ध्या तासाला शटल बस सेवा चालू करावी.असे दिलेल्या पत्रामध्ये म्हटले असून यावर दौंड शहर काँग्रेसचे अध्यक्ष हरेश ओझा यांची स्वाक्षरी आहे.