इंदापूर : निरा डावा कालव्यातून तसेच खडकवासला कालव्यातून चालू खरीप हंगामामध्ये उभ्या पिकांना आवर्तन देण्यात येणार आहे. तसेच शेटफळ तलावामध्ये निरा डावा कालव्याचे आवर्तन संपल्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय हा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.2) दिली.
पुणे येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली निरा डावा तसेच खडकवासला कालव्याच्या सल्लागार समितीची बैठक शनिवारी सायंकाळी पार पडली. या बैठकीतील निर्णयांची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. ते म्हणाले, सणसरकटमधून इंदापूर तालुक्याच्या हक्काचे पाणी हे तालुक्यातील शेतीसाठी देण्यात यावे, भाटघर धरणातून निरा नदीच्या पात्रात पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे, या मागण्या बैठकीमध्ये केल्या आहेत. सध्या जलसंपदाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने तो भरण्यावर या बैठकीत चर्चा झाली.
तसेच निरा डावा कालव्याचे ठिकठिकाणचे फाटे, दारे हे अनेक ठिकाणी कुमकुवत झाल्याने त्याची दुरुस्तीची कामे करण्यात यावीत, अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. आगामी काळात होणाऱ्या पावसाचा आढावा घेऊन पुढील नियोजनासाठी 15 ऑक्टोबरला बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
या बैठकीस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राहूल कुल, अशोक पवार, समाधान अवताडे, शहाजीबापू पाटील आदींसह जलसंपदाचे वरिष्ठ अधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.