मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेत, भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. राज ठाकरे यांनी मात्र भाजपाची विनंती अमान्य करीत उलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घ्या. आणि ऋतुजा लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती करीत भाजपाची कोंडी केली होती. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असे आवाहन केले होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींचे निधन झाले व त्यांच्या कुटुंबातील कोणी पोटनिवडणूक लढवीत असल्यास शक्यतो निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल. अशी पवार यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भूमिका मांडली होती.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी सध्या राजकीय वातावरण तापले आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहे. मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला होता. मात्र, अनेक राजकीय नेत्यांच्या विनंतीनंतर भाजपने आपला अर्ज मागे घेतला आहे.