अजित जगताप
वडूज : खटाव तालुक्यातील नागाचे कुमठे या गावातील अल्पवयीन सतरा वर्षाची युवती अठरा महिन्यांपूर्वी दिनांक ११ मार्च पासून बेपत्ता झालेले आहे. सदर युवतीच्या पालकांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन त्या मुलीच्या तपासाबाबत विनंती केली. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे नेते आठवलेंनी सातारा पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत.
खटाव तालुक्यातील नागाचे कुमठे या गावातून एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन युवतीचे त्याच गावातील सव्वीस वर्षाच्या एका मुलाने अपहरण केले होते. त्याबाबत सदर मुलीच्या पालकांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने शोध घेतला असता ते युवती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी औंध पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार केली.
या प्रकरणाला आठ महिने होऊनही मुलीचा तपास न लागल्यामुळे पालक हतबल झालेले होते. सदर मुलीचा कोणताही संपर्क होऊ शकला नसल्याने मुलीचा घातपात झाल्याचा संशय मुलीच्या आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.
सदर बाब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार आठवले यांनी सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दूरध्वनीद्वारे सांगितली व याबाबत तातडीने तपास करावा अशी सूचना केली. सदर युवती अल्पवयीन असल्यामुळे आरोपींच्या विरोधात पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी पालकांनी केलेली आहे.यावेळी खटाव तालुक्यातील रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.