लहू चव्हाण
पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणी शहरातील विविध विकास कामांसाठी ७७ कोटी निधी उपलब्ध करून देण्याबद्दल नगरविकास विभागाला शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री यांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले होते. या पत्राच्या माध्यमातून दि.२७ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाबळेश्वर येथे झालेल्या बैठकीचा संदर्भ देण्यात आला असल्याची माहिती पाचगणी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सचिन भिलारे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २७ ऑगस्ट रोजी महाबळेश्वर शहरात आले असता त्यांच्या उपस्थित पाचगणी पालिकेतर्फे सुरू असलेल्या कामांचा व नव्याने केल्या जाणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता.
याच बैठकीचा संदर्भ देत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की पांचगणी शहरात येणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिकांना सेवा-सुविधा देण्यासाठी शहरामधील प्रसिद्ध टेबललॅन्ड पठार येथे क्लस्टर्ड शॉपिंग इन्फारमल स्टॉल्स विकसित करणे, सिडने पाईंट ते दांडेघर नागा पर्यंतचा सार्वजनिक रस्ता कॉक्रीटीकरण करणे, भिलारे स्टेडियम विकसित करणे, पारशी पॉईंट विकसित करणे, भाजी मार्केट विस्तार करणे, विविध ठिकाणी सिवरेज लाईन व एस.टी.पी. विकसित करणे इ. प्रस्तावित विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर विकास कामांची मंजुरी लवकरात लवकर मिळून महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असा विश्वास भिलारे यांनी व्यक्त केला.