लातूर: राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणच्या (Reservation) पार्श्वभूमीवर आरक्षणाचा वाद अधिकच तीव्र झाला आहे. पण या वादात आता लातूर जिल्ह्यातील आत्महत्यांच्या घटनांवरून मोठा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. दरम्यान, अनेक जणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरक्षणासाठी मोठा बनाव रचल्याचा आरोप पोलिस तपासातून स्पष्ट झाला आहे.

लातूरमध्ये झालेल्या तिन्ही घटनांमध्ये मृतांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठ्या त्यांनी स्वतः लिहिल्या नव्हत्या, तर त्या इतरांनी जाणूनबुजून ठेवल्या होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अहमदपूर, निलंगा आणि चाकूर या तीन ठिकाणी स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून तपास सुरू आहे.

अहमदपूर तालुक्यातील शिंदगी गावात 26 ऑगस्ट 2025 रोजी बळीराम श्रीपती मुळे (वय 36) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. पोलिस तपासानंतर उघड झाले की, त्यांच्या खिशात ठेवलेली “मराठा आरक्षणासाठी आत्महत्या” अशी चिठ्ठी त्यांच्या चुलतभावाने संभाजी मुळे यांनी ठेवली होती.

निलंगा तालुक्यातही अशीच बनावट चिठ्ठी सापडली होती. दादगी गावातील शिवाजी वाल्मीक मेळे यांचा विजेच्या शेगडीला करंट लागून मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्या खिशात ‘महादेव कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली’ अशी चिठ्ठी सापडली होती. तपासानंतर ती चिठ्ठी माधव रामराव पिटले यांनी लिहिल्याचे उघड झाले.
चाकूर तालुक्यातील हनुमंतवाडी येथील अनिल बळीराम राठोड यांच्या खिशात ‘बंजारा समाजाला आरक्षण मिळावे’ अशी चिठ्ठी सापडली होती. मात्र, ती चिठ्ठी नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड यांनी तानाजी जाधव यांच्या सांगण्यावरून लिहिली असल्याचे पोलिसांना समजले.
या तिन्ही प्रकरणांत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून, त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, सर्व मृतांच्या हस्ताक्षरांचे नमुने घेऊन शास्त्रोक्त तपास करण्यात आला आणि सीआयडीकडे पाठविल्यानंतरच हे प्रकरण स्पष्ट झाले.
या खुलाशानंतर राज्यातील आरक्षण राजकारण आणखी तापले असून राज्यात या घडामोडींनी चांगलाच गोंधळ उडवला आहे.







