दिल्ली : “तुम्ही कर्नाटकात आमच्या वाहनांवर हल्ले करत आहात, पण तुम्हालाही देशभरात कुठेही जायचं असेल तर महाराष्ट्रातूनच जावं लागतं हे लक्षात ठेवावं. कोल्हापूर, सोलापूर कुठेही जायचं असेल तर त्यांच्या वाहनांना महाराष्ट्रातून जावं लागतं याची जाणीव त्यांना असली पाहिजे, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमाप्रश्नावरून सुरु असलेला वाद थेट दिल्ली पर्यंत पोचला असून याचे पडसाद दिल्लीत देखील उमटले आहेत. कर्नाटकने घेतलेल्या भूमिकेवर राज्यातील नेते संताप करता असताना भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी थेट इशारा देताना तुम्हाला भारतात कुठेही जायचे असल्यास तुम्हाला महाराष्ट्रातूनच जावे लागत असल्याचे सांगितले.
“मी कोल्हापुरात स्थायिक असून माझ्यापासून १० किमी अंतरावर कर्नाटक हद्द सुरु होते. पण काल महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीचा मी जाहीर निषेध करतो. हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. पण असं असताना रस्त्यांवरची अशी दादागिरी, गुंडगिरी करणं हे त्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नागरिकांना शोभत नाही” असे मत पुढे बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.
आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून हा प्रश्न दिल्ली येथे गाजणार असल्याची शक्यता आहे.