बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांमध्ये वाद होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्ताधाऱ्यांनी जर मला तुरुंगात टाकलं, तर मी तुरुंगातूनही लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं तुपकर यांनी म्हटलं आहे.
रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना जिल्ह्यातील प्रशासनाशी त्यांचे वारंवार खटके उडत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून जामीन रद्द व्हावा यासाठी सरकारने कोर्टात अर्ज केला आहे. या अर्जात तुपकर यांचा जामीन अर्ज रद्द करावा आणि त्यांना तुरुंगात टाकावे असे पोलिसांनी म्हटले आहे.
त्यापार्श्वभूमीवर तुपकर यांनी जर आपल्याला अटक झाली तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत लढणार असून त्यासाठी तुरुंगातूनही निवडणूक लढवू असा इशारा दिला आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांचा एका सभेत बोलताना तोल गेला. रायमुलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना सभेत घुसून कानाखाली मारण्याची भाषा केली होती. रविकांत तुपकर सध्या जिल्ह्यात एल्गार परिवर्तन मेळावे घेत आहेत, गावोगावी जाऊन शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांशी चर्चा करीत आहे. तसेच त्यांच्याकडून लोकसभा लढविण्यासाठी मोठा निधी देखील उभा करीत आहेत.