अमरावती : अमरावतीच्या चर्चित पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांना शासन निर्णयानुसार बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांची बदली सशस्त्र पोलीस विभागात अपर पोलिस आयुक्तपदी करण्यात आली आहे. अमरावती येथील राणा दाम्पत्य आणि डॉ. आरती सिंग यांच्यातली वाद विकोपाला गेल्याने खासदार नवनीत राणा यांनी आयुक्त सिंग यांच्या बदलीची मागणी केली होती.
आज शासकीय निर्णयानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. काही महिन्यांपूर्वी डॉ. आरती सिंग व राणा दाम्पत्य यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. अमरावतीमधील कथित लव्ह जिहाद प्रकरण, अमरावती दंगल प्रकरण, उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या विविध विषयावरून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी आरती सिंह यांच्यात खडाजंगी झाली होती. यावेळी राणा दाम्पत्याने आरती सिंग यांच्या विरोधात भूमीका घेतली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नवनीत राणा यांनी डॉ. आरती सिंग यांची बदली करण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे केली होती.
दुसरीकडे राणा दाम्पत्याने गणपतीनंतर डॉ. आरती सिंग यांची बदली होणार असल्याचे भाकीत केले होते. मात्र अनेक राजकीय दबावानंतर देखील आरती सिंग यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. आता त्यांच्या जागी नागपूर पोलीस पोलीस आयुक्तालयातील नवीन चंद्र रेड्डी हे पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्य आणि आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्यात कुणाचा विजय झाला, याची चर्चा अमरावतमध्ये रंगताना दिसून येत आहे.