NDA Cabinet Minister : नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या शपथविधीपूर्वी मंत्रिमंडळात राज्यातील कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु झाली होती. राज्यातील मोठ्या नेत्यांना दिल्लीतून फोनाफोनी सुरु आहे. या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातून रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना रक्षा खडसे भावूक झाल्याचे दिसून आले. माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
रक्षा खडसे पुढे म्हणाल्या की, माझी राजकारणाची सुरुवातच ही आदरणीय एकनाथ खडसे यांच्यापासून झाली आहे. माझ्या संपूर्ण राजकीय प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा आहे. माझ्या माहेरच्या लोकांचा राजकारणाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. परंतु सामाजिक कामाची आवड मला माझ्या वडिलांपासून मिळालेली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी, रक्षा खडसे भावूक
एका राजकीय घराण्यात मी सून म्हणून आले. नाथाभाऊ यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. माझ्या आयुष्यातील बरेच चढ उतार आले. त्या परिस्थितीत नाथाभाऊंनी मला खूप साथ दिली आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांसोबतच सर्व जनताही मला साथ देत आली आहे. हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा आहे. इतक्या मोठ्या पातळीवर मला संधी मिळत आहे, असे बोलताना खासदार रक्षा खडसे भावूक झाल्याचे दिसून आले. मला कुठली अपेक्षा नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे, असेही रक्षा खडसे यांनी म्हटले.
सासरे एकनाथ खडसे काय बोलले?
रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीला बोलवले हा आपल्या आयुष्यातील मोठा आनंदाचा क्षण आहे. रक्षा खडसे यांनी अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचे हे फळ आहे. त्यांच्या पाठीशी असलेल्या जनतेच्या आशिर्वादांमुळे हे शक्य झाले आहे. देशाबरोबरच आपल्या भागासाठी सुद्धा रक्षाताई नक्की योगदान देतील, असा आपल्याला विश्वास आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातून ‘या’ पाच जणांना कॉल
महाराष्ट्रातून भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल आणि उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. आरपीआयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार यांच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याची चर्चा रंगली असतानाच शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी फोन गेला असल्याची माहिती समोर आली आहे.