मुंबई : धारावी विकास प्रकल्पाविरोधात निघालेल्या मोर्चावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निधाला होता. महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हा मोर्चा होता. धारावी प्रकल्पात सेटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला अशी शंका पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
धारावीमधील आंदोलनावर राज यांना त्यांचे मत विचारण्यात आले, “मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय. हा प्रकल्प परस्पर अदानींना का दिला? अदानींकडे असं काय आहे की विमानतळ तेच हाताळू शकतात. कोळसाही तेच हाताळू शकतात. एवढा मोठा प्रकल्पही तेच गाताळू शकतात. टाटा वगैरेसारख्या एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्याकडून टेंडर मागवायला हवं होतं. पण ते झालं नाही,” असं म्हणत अदानींना हा प्रकल्प देण्यासंदर्भात राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले.
मला एवढाच प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये महाविकास आघाडीला आज का जागा आली? मला वाटतं हे जाहीर होऊन 8 ते 10 महिने झाले असतील ना? आज का मोर्चा काढला आहे? सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? कशासाठी मोर्चा काढला?” असा प्रश्न राज यांनी मोर्चा काढणाऱ्या राजकीय पक्षांना विचारला आहे.
त्याचबरोबर राज ठाकरेंनी कामाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे, “मी बीबीडी चाळीत गेलो होतो तेव्हा पण म्हणालो होतो की अशा जागी ओपन स्पेस लागते. किती शाळा होणार तिथे, किती कॉलेज होणार? रस्ते किती होणार? इमारतीत राहणारी माणसं किती? टाऊन प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट सांगावी लागते की नाही. एरिया घ्यायचा आणि सांगायचं की अदानींना देऊन टाकला. असं थोडी असतं?” असं म्हणत प्रकल्पाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.