दीपक खिलारे
इंदापूर : तरंगवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने बसविण्यात आलेल्या आर. ओ. पाणी फिल्टरमधून गेली चार- पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराकडे संबंधित ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
गावातील हजारो नागरिक, लहान मुले व शाळकरी मुले या पाण्याचा पिण्यासाठी वापर करीत आहेत. गेली चार ते पाच दिवसांपासून या फिल्टरमधून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केला जात आहे.
यामुळे नागरिकांना जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली आहे.
यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ या प्रकाराची दखल घेऊन आर. ओ. फिल्टरमधून नागरिकांना शुद्ध, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.