Pune News : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना साथ देत सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर काही दिवसांत त्यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर काही वेळातच आरोपीला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथून अटक केली होती. दरम्यान, या अटक प्रकरणात आता ट्विट आला आहे. तरुणाला केलेली अटक बेकायदेशीर असल्याची धक्कादायक बाब लोक अभिरक्षक कार्यालयाने न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिली आहे. त्यानंतर आरोपीची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने सुटका
भुजबळ यांना धमकी देणारा आरोपी प्रशांत दशरथ पाटील (वय २४) याची सुटका झाली आहे. (Pune News) या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करताना पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे नमूद करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशीला पाटील यांनी तरुणाची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे.
छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने फक्त भुजबळ यांनाच धमकी दिली नाही तर शिंदे सरकारमधील राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकी दिली. (Pune News) रात्री बारा वाजता त्यांना कॉल करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने दिलीप वळसे पाटील यांनाही कॉल केला. मात्र, दिलीप वळसे पाटील यांचा कॉल उचलला गेला नसल्याचे तपासात उघड झाले होते.
दरम्यान, आरोपीने वकील न पुरविल्याने त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील पुरविण्यात आला होता. लोक अभिरक्षक कार्यालयाचे ॲड. सचिन साळुंके यांनी आरोपीची बाजू मांडली.
साळुंके यांच्या युक्तीवादानुसार, अर्नेशकुमार विरुद्ध बिहार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सात वर्षांच्या आतील शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यापूर्वी नोटीस पाठवणे आवश्यक आहे. तसेच गुन्हा अदखलपात्र असल्यास त्याची चौकशी व अटक करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. या दोन्ही बाबी पोलिसांनी पाळल्या नाहीत, असा युक्तिवाद ॲड. सचिन साळुंके यांनी केला. (Pune News) तो न्यायालयाने ग्राह्य धरला. आता दोन्ही प्रकरणात महाराष्ट्र पोलीस कसा तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दाजीच्या खून प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर ; ॲड. सुधीर पाटील यांचा प्रभावी युक्तिवाद