जीवन सोनवणे
Pune News : हवेली : शिवापूर (ता. हवेली) येथे कोंढाणपूर फाटा ते सिंहगड रस्त्यावरील असलेल्या शिवापूर ते श्रीरामनगर दरम्यानच्या गेली पाच वर्षे रखडलेल्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी घरावर पाटी लावण्यासाठी सरपंच होऊ नका. तर गावचा विकास कसा करता येईल, यावर अभ्यास करा, असे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले.
गेली पाच वर्षे रखडलेल्या रस्त्याचे भूमिपूजन
आजपर्यंत शिवगंगा खोऱ्याला भरपूर निधी मंजूर करून दिला आहे. त्याप्रमाणे कामेही झालेली आपण पाहताय. त्यामुळे गावातील हेवे दावे सोडून गावातील विकासाला प्राधान्य द्या. कारण माझ्या दृष्टीने गावचा विकास हाच पक्ष आहे. त्यामुळे मी निधीला कमी पडणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या स्नेहा दिघे, रोहित खाडे यांसह मार्गदर्शक योगेश सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला.
तापकीर म्हणाले की, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नांदेड ते पानशेत, कोंढणपूर ते तोरणा या रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. खरंतर या रस्त्याचे काम लवकर होणे गरजेचे होते. मात्र, काही ठेकेदार काम नीट करत नाहीत. कामे अर्धवट सोडतात, तर कधी निकृष्ट करतात. याकडे आपल्या भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे निवडून येण्यासाठी नियोजन करता, तसेच नियोजन आपल्या गावाच्या विकासासाठी करा, असा सल्लाही दिला.
यावेळी पाण्यासाठी मोदी सरकारने ६२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारचे आभार मानून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे मतदारसंघातर्फे अभिनंदन केले. तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली.
जिल्हाप्रमुख रमेश कोंडे म्हणाले की, या दरम्यानच्या रस्ता हा डांबरीकरणाचा करत असताना दिवंगत माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ लांडगे यांनी बंद पाडून सदर रस्ता काँक्रिटिकरणचा पाहिजे, अशी मागणी केली होती. त्या मागणीला आमदार तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली व भागातील सरपंच यांच्या पाठपुराव्यामुळे सरकारने निधी मंजूर केला. खऱ्या अर्थाने मागणीला एकप्रकारे यश आले याची आठवण करून दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, माजी पं. स. सदस्य अनिरुद्ध यादव, सरपंच अण्णा दिघे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक रजपूत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, भाजप शिवगंगा खोऱ्याच्या अध्यक्षा दीपाली वाव्हळ, चंद्रकांत हवलदार, माजी सरपंच सतीश दिघे, अमोल कोंडे, स्वप्नील जगताप, राकेश गाडे, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश दिघे, उपसरपंच राजू सट्टे, राजेंद्र दिघे, सुनील नावडकर, ओमकार हवलदार आदी उपस्थित होते.