संभाजीनगर (औरंगाबाद) : वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी चक्क लोकनियुक्त सरपंचाने अर्धनग्न होऊन आंदोलन केल्या महावितरणच्या अधिकाऱ्याची पळापळ झाल्याची घटना नुकतीच घडली. मंगेश साबळे यांनी अशा प्रकारचे आंदोलन केल्याने महावितरणने त्वरित त्याच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. अशा प्रकारचे हे राज्यातील पहिलेच आंदोलन असण्याची शक्यता आहे.
गेवराई तालुक्यातील पायगा गावातील एक ट्रान्सफार्मर अनेक दिवसांपासून बंद होते. तर दुसरे चार दिवसांपूर्वी जळाले होते. दोन्ही ट्रान्सफार्मर खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत होते. ट्रान्सफार्मर पाहिजे असेल तर पहिले वीजबिल भरा, अशी अट महावितरण कार्यालयाने घातली. रब्बीची पिके डोळ्यासमोर सुकत असल्याने शेतकरी मात्र अधिकाऱ्यांना गयावया करीत होते.
यातच गावाच्या पाणीपुरवठ्याचा ट्रान्सफार्मर देखील चार दिवसांपूर्वीच जळाल्याने ग्रामस्थ पाण्यावाचून कासावीस झाले. यासाठी प्रयत्न करूनही महावितरणचे अधिकारी दाद देत नव्हते.
अभिनव पद्धतीने आंदोलन करणारे काँग्रेसचे मंगेश साबळे हे सरपंचपदी निवडून आले. मंगेश साबळे यांनी अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर वीजबिल भरण्यास सांगितले. अधिकारी मागणीला दाद देत नसल्याचे पाहून त्यांनी अर्धनग्न होत आळंद महावितरण कार्यालय गाठताना कनिष्ठ अभियंता कडूबा काळे यांच्या दालनातच ठिय्या दिला. त्यांचा हा अवतार पाहून अधिकारी देखील चक्रावले. या प्रकाराने प्रशासन यंत्रणा हलली व त्यानंतर दुपारपर्यंत दोन्ही ट्रान्सफार्मर गावात हजर झाले.
त्यानंतर गावात सायंकाळपर्यंत ते बसविण्याचे काम वेगाने सुरू होते. संगेश साबळे यांच्या या आंदोलनाची परिसरात दिवसभर चर्चा होत होती. सरपंच झाल्यानंतर साबळे यांचे हे पहिलेच आंदोलन होते. जेथे महिने लागतात, तेथे एका दिवसांतच महावितरणने ट्रान्सफार्मर दिल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
वीजबिल पाहिजे असेल, तर सर्वच दुरुस्त्या करा असे गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले. आंदोलन झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वीजबिल भरण्याची मागणी केली. मात्र प्रथम ट्रान्सफार्मर द्या, तसेच परिसरात सडलेले विद्युत पोल, लोंबकळणाऱ्या तारा, उघडे ट्रॉन्सफार्मर याची संपूर्ण दुरुस्ती करा, तरच आम्ही वीजबिल भरू, असे साबळे यांनी सांगितले आहे.