मुंबई : राज्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम १ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहेत. अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या कार्यक्रमांतर्गत नव्या अर्हता दिनांकानुसार मतदार नोंदणी करण्याबाबत तसेच मतदाराचा मृत्यु झाल्यास नाव वगळणे, पत्यातील बदल, नावातील बदल इत्यादी बाबी नोंदविता येणार आहेत.
विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून १९ व २० नोव्हेंबर आणि ३ व ४ डिसेंबर या दिवशी राज्यभर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. वंचित घटकांसाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात महिला आणि दिव्यांग यांच्या नाव नोंदणीसाठी १२ व १३ नोव्हेंबर रोजी आणि तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर २६ व २७ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत.
तरुण मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट्स, तसेच राज्यातील महाविद्यालये यांच्या सहकार्याने राज्यभर मतदान नोंदणीची शिबिरे राबविण्यात येणार आहेत.
दरम्यान, मतदार नोंदणी, नाव वगळणे तपशीलातील दुरुस्त्या इ. सुविधा NVSP, Voter |Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline या मोबाईल अॅपवर उपलब्ध करण्यात आले आहे. दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी राज्यातील विविध पोलीस ठाण्यात स्थानिक BLO बसविण्यात येणार असून त्यांच्यामार्फत मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सहकार्याने १० नोव्हेंबर रोजी राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्याअंतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या खिया गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच, दुबार नावे, मृत व्यक्ती गावातून कायमस्वरुपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या खिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.
आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी फक्त १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा म्हणजे १ जानेवारी किंवा १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र २०२३ पासून १ जानेवारी १ एप्रिल १ जुलै आणि ऑक्टोबर या दिवशी किंवा त्याआधी ज्यांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना ९ नोव्हेंबर, ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमेअंतर्गत आगाऊ नाव नोंदणी करता येणार आहे. तेव्हा या तारखांना अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या मुला-मुलींनी जरूर नाव नोंदणी करून घ्यावी. भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून ही नाव नोंदणी ऑनलाईनही करता येणार आहे.
नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. तर मतदारांना त्यामध्ये आपलं नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदार संघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. ब-याचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपलं नाव मतदार यादीत नाही अशी तक्रार अनेक मतदाराकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासणं महत्वाचं आहे.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलीसाठी मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय सहायक (BLA) यांची नेमणूक करावी. मतदान केंद्रस्तरीय सहायक (ELA) यांना त्यांच्या विभागातील अपंग १८-१९ वयोगटातील मतदारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करत तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer) (BLO) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याबाबत निर्देशीत करावेत, अशा सूचना महाराष्ट्र राज्याचे सह्मुख्य निवडणूक अधिकारी म रा परकर यांनी केल्या आहेत.
सदर कार्यक्रम आपल्या जिल्हयात राबविण्याच्या दृष्टीने व मतदारांमध्ये याबाबत जागृती करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करून जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्याकरिता व मतदार यादीतील दोष दूर करण्याकरिता प्राधान्याने सहभाग द्यावा, असे आवाहन भाजपचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी याम्नी केले आहे