पुणे : भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली-मोशी- चऱ्होली- डुडूळगाव- जाधववाडी आदी समाविष्ट गावांतील सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या समस्या निकालात काढण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी झंझावात सुरू केला आहे. एकाच दिवसात ‘ऑन दी स्पॉट’ फैसला केल्यामुळे रस्ते, पाणी आणि वीज संदर्भात सुमारे ७० सोसायटीधारकांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिली.
मोशी आणि परिसरातील समाविष्ट गावांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नव्याने विकसित होणाऱ्या या ‘रेसिडेंसिअल कॅरिडॉर’मध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. पाणी, वीज आणि अंतर्गत रस्त्यांच्या रखडलेल्या कामांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. याबाबत भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी ज्या ठिकाणी समस्या आहे. त्याच ठिकाणी जागेवर जावून महावितरण, महापालिका अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी मॅरेथॉन बैठक घेतली.
यावेळी माजी महापौर राहुल जाधव,माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, सचिव प्रकाश जुकंटवार, उपाध्यक्ष लक्ष्मीमंत बोंडे, धीरज सिंग, अमोल बांगर, महावितरण चे अधिकारी उमेश कवडे, रमेश सूळ, महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, दिनेश पाठक, अनिल ईदे, स्थापत्य विभागाचे अनिल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, निखिल बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे, क्रिस्टल सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, तसेच परिसरातील सोसायट्यांचे चेअरमन व पदाधिकारी, सोसायटी सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, सोसायटीधारक आणि स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या ‘ऑन दी स्पॉट’सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याबाबत आमदार लांडगे यांनी रहिवाशांनी आभार मानले आहेत.
आमदार लांडगे म्हणाले की, मागील अडीच वर्ष राज्य पातळीवर आपली सत्ता नसल्याने विकासकामांत अडथळे येत होते. मात्र, सुदैवाने आता राज्यात आपल्या विचारांचे सरकार आहे. प्रत्येक सदनिकाधारक हा माझ्या परिवारातील सदस्य आहे, असे मी समजतो. त्यासाठी आता पूर्ण जोमाने कामे केली जातील. चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून नोव्हेंबर २०२२ मध्ये अपेक्षीत असलेले पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासक व राज्यात विरोधी पक्षाची सत्ता असल्याने मिळाले नाही. मात्र, आता लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच, रखडलेली विकासकामेही मार्गी लागतील, असा दावाही आमदार लांडगे यांनी केला.
क्रिस्टल सीटी सोसायटीची वीज समस्या सुटणार…
क्रिस्टल सीटी सोसायटीत रोज दिवसातून २ ते ३ तास वीज पुरवठा खंडित होत होता. याबाबत आमदार लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. तसेच, अवघ्या दोन तासांत तोडगा काढण्यात आला. क्रिस्टल सीटी सोसायटीला दुसऱ्या ठिकाणाहून वीज जोडणी करून देण्यात आली. आता यापुढे या सोसायटीला पूर्वीप्रमाणे सतत वीज समस्या जाणवणार नाही, अशी आशा आहे, असे संजीवन सांगळे यांनी सांगितले.
शिवरोडचे काम तात्काळ मार्गी…
क्रिस्टल सीटी सोसायटी समोरील देहू -आळंदी रोडपासून स्वराज कॅपिटल सोसायटीपर्यंतच्या रोडचे काम रखडले होते. या परिसरातील २० मोठ्या सोसायट्यामधील सदस्यांना, महिला भगिनींना प्रवास करताना त्रास होत होता. ही गोष्ट सोसायट्यामधील महिला भगिनींनी आमदार महेश लांडगे यांच्यासमोर मांडली. यावर त्यांनी ‘ऑन दी स्पॉट ’ पिंपरी-चिंचवड मनपाचे अधिकारी, ठेकेदार, सन्माननीय शेतकरी बांधवांना बोलवून घेऊन मिटिंग घेऊन सर्व विषय निकाली काढले व रोडचे काम तात्काळ सुरू झाले. आगामी आठ दिवसांत रोडचे काम पूर्ण होणार आहे.
वीज समस्या सोडवण्यासाठी पुढाकार…
चिखली-मोशी-जाधववाडी -बोऱ्हाडेवाडी या परीरातील वीज पुरवठा सतत खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरण संबंधित देखभाल दुरूस्तीची कामे तात्काळ मार्गी लावावी. यापुढील काळात वीज समस्या उद्भवणार नाही, अशा सूचना आमदार लांडगे यांनी महाविरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.