मुंबई : तपास यंत्रणांच्या गैरकारभाराची माहिती एकत्रित करून संसदेतील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांबरोबर देशाचे गृहमंत्री आणि शक्य झाल्यास पंतप्रधानांना भेटणार आहोत, अशी माहिती प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली आहे.
माजी मंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली होती. तेरा महिन्यांनंतर त्यांना जामीन मिळाला. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
शरद पवार पुढे म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग कसा होतो याचे अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण आहे. न्यायालयाने दिलेला निकाल हा अनिल देशमुखांवर अन्याय करणाऱ्यांना सुबुद्धी देण्यासाठी आणि त्यांच्या धोरणात बदल करण्यासाठी उपयुक्त ठरेल, ही अपेक्षा आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.
देशमुख यांच्यावर आधी शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला. दोषारोप पत्र ठेवताना ही रक्कम साडेचार कोटी रुपये दाखविण्यात आली आणि अंतिम दोषारोपपत्रात एक कोटी दर्शविण्यात आली. त्यामुळे तपासी यंत्रणांच्या गैरकारभाराची माहिती एकत्रित करून संसदेतील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांबरोबर गृहमंत्री आणि शक्य झाल्यास पंतप्रधानांना भेटणार आहोत. आमच्या सहकाऱ्यांवर जी वेळ आली ती वेळ अन्य कोणावरही येऊ नये, यासाठी ही भेट असेल. अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.