अहमदाबाद : दोन टप्प्यात होणाऱ्या गुजरात निवडणुकीसाठी उद्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचाराला प्रारंभ करणार असून भाजपाच्या उमेदवारांसाठी मोदी यांच्या तब्बल २५ सभांचे आयोजन गुजरात भाजपाकडून करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (२० नोव्हेंबर) रोजी सौराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून तेथील विविध ठिकाणी भेट देणार असून जाहीर सभांना संबोधित करणार आहेत.
गुजरात हे भाजपसाठी महत्वाचे राज्य असल्याने पुन्हा सत्ता राखण्यासाठी गुजरात भाजपाच्या वतीने जोरदार तयारी करत मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी काही ठिकाणी रोडशो देखील करणार आहेत. या रोडशोसाठी सुरक्षा यंत्रणांनी देखील आपली कंबर कसून तयारी केली आहे. पंतप्रधान मोदी यांना विशेष दलाची सुरक्षा असते.
गुजरात पोलिस दलाच्या वतीने पंतप्रधान यांच्या सुरक्षेसाठी ९ अधीक्षक, १७ उपअधीक्षक,. ४० पोलीस निरीक्षक, ९० पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह तब्बल १५००० पोलिसांची तैनाती करण्यात आले आहेत.
या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, खासदार निराहुआ, रवी किशन, मनोज तिवारी, हेमा मालिनी, परेश रावल, माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, नितीन पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे सर्व फायरब्रँड नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरणार आहेत.