पुणे : ‘शासकीय जागेतील अतिक्रमण प्रकरणात दोषी आढळल्याने मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील विद्यमान सरपंच निखिल उंद्रे यांचे सरपंच व सदस्यपद अपात्र घोषित करण्यात आले आहे. असे आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी दिले आहेत.
निखिल उंद्रे यांनी ग्रामपंचायतील मासिक सभेमध्ये बेकायदेशीर व नियमबाह्य ठराव केल्याप्रकरणी संदीप ज्ञानोबा उंद्रे यांनी पुराव्यांसह विभागीय आतुक्तांकडे तक्रार केली होती.
ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमधील बेकायदेशीर व नियमबाह्य ठरावाप्रकरणी सरपंच निखिल उंद्रे व इतर यांना पदावरून काढून टाकणेबाबत संदीप उंद्रे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करून विनंती केली होती. त्यावरून विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ (१) अन्वये विद्यमान सरपंच निखिल उंद्रे यांना ग्रामपंचायत मांजरी खुर्द चे ‘सरपंच व सदस्य’ पदावरून काढून टाकण्याचे आदेश पारित झाले होते.
त्यानंतर निखील चंद्रे यांनी ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यानंतर मंत्री (ग्रामविकास) यांनी विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्या दि.१२.०९.२०२२ रोजीच्या आदेशाला स्थगिती आदेश दिली आहे. या आदेशाला स्थगिती महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव नीला रानडे यांनी दिली होते. त्यानंतर सदर प्रकरणी विभागीय आयुक्त पुणे यांच्या आदेशाला माननीय मंत्री ग्रामविकास यांनी ३० दिवसांसाठी तात्पुरता एकतर्फी स्थगिती आदेश दिलेले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार निखिल उंद्रेच पाहत होते.
दरम्यान, अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ.अनिल रामोड यांनी प्रस्तुत प्रकरणी मांजरी खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य निखिल उंद्रे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ज-३) मधील तरतुदीनुसार अपात्र घोषित करण्यात येत आहे. अपात्र घोषित केलेमुळे त्यांचे ‘सरपंच’ व ‘ग्रामपंचायत सदस्य’ पद मुदती पूर्वीच संपुष्टात आले आहे. तर निखिल उंद्रे यांना याप्रकरणी आता मंत्री महोदयांकडे (राज्य शासनाकडे) दाद मागण्याची कायद्यात तरतूद नसल्यामुळे त्यांना कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही.