प्रा. सागर घरत
Politics करमाळा : ज्या शरद पवारांनी उभी हयात कार्यकर्ते घडविण्यात त्यांना आमदार-खासदार आणि मंत्री करण्यात घालवली. त्याच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवारांना उतरत्या वयात केंद्रीय यंत्रणेच्या भीतीपोटी आणि सत्तेच्या लालसेमुळे एकटे सोडले. मात्र, याच शरद पवारांसाठी जनशक्ती संघटना धावून आली असून, राष्ट्रवादीला जनशक्ती संघटनेचे बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे-पाटील राष्ट्रवादीसोबत जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Politics)
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदारही गेले आहेत. असे असताना शरद पवार यांच्यासोबत जनशक्ती संघटना येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर जनशक्ती संघटना राष्ट्रवादीसोबत गेली तर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी अतुल खूपसे पाटील यांच्या खांद्यावर येण्याची शक्यता देखील आहे.
राज्याच्या राजकीय इतिहासामध्ये खूप मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. गेल्या वर्षी शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 40 आमदार गेले, एवढेच नव्हे तर त्या आमदारांनी शिवसेनेवर हक्क आणि दावा सांगितला. नेमकी अशीच घडामोड यंदा देखील घडली. राष्ट्रवादीचे सुमारे ३५ ते ४० आमदार फुटून त्यांनी अजित पवार यांच्यासोबत वेगळी चूल मांडली आणि सत्तेत देखील सहभागी झाले. आता याच अजित पवार गटाने राष्ट्रवादीवर देखील दावा सांगितला आहे. त्यामुळे सध्या शरद पवार गट अर्थात मूळ राष्ट्रवादी एकाकी पडल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसून येत आहेत.
अतुल खुपसे पाटील उद्या घेणार पवारांची भेट
या एकाकी पडलेल्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रातील ‘पॉवरफुल’ चळवळीची संघटना असणारी जनशक्तीची साथ लाभणार आहे. जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांची भेट घेतली असून, उद्या ते वायबी सेंटर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
एक ठिणगी पडली अन् खुपसे-कडू झाले वेगळे
अतुल खूपसे पाटील हे प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख होते. या कालावधीत त्यांनी महाराष्ट्रभर प्रहार संघटनेचे जाळे वाढविले. महाराष्ट्र पिंजून काढत बच्चू कडू यांचा विचार गावोगावी पोहोचविला. मात्र, अंतर्गत वादामुळे आणि चुकीच्या गैरसमजामुळे बच्चू कडू आणि अतुल खूपसे पाटील यांच्यात ठिणगी पडली. त्यानंतर त्यांनी स्वतःची जनशक्ती संघटनेची स्थापना केली.
राष्ट्रवादीला मिळणार प्रभावी चेहरा
जनशक्ती संघटनेने आजपर्यंत अनेक लक्षवेधी आंदोलने केली आहेत. प्रभावी वक्तृत्व, संघटनात्मक कौशल्य अशी छाप असणाऱ्या अतुल खूपसे पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ दिल्यास राष्ट्रवादीला एक तगडा आणि प्रभावी चेहरा मिळणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे उद्या शरद पवार यांच्या भेटीत काय निर्णय होतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.