Politics मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार महाविकास आघाडीवर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. पवार महायुतीत जातील असे आता उघड उघड बोलले जात आहे. तसेच अजित पवारांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचेही म्हटले जात आहे. यावर ‘मुंबई तक’या चॅनेलवर एक चर्चा सत्र आयोजण्यात आले होते. या चर्चा सत्रात जेष्ठ पत्रकार निखील वागळे सहभागी झाले होते. त्यावेळी निखील वागळेंनी राष्ट्रवादीतील अस्वस्थता आणि अजित पवार काय करु शकतात याबद्दल आपली भूमिका मांडली.
वागळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एक सल्लाही दिला असून शरद पवारांनी आता निवृत्त व्हायला हवे, असा खळबळजनक सल्ला दिल्याने राजकारणात याचे काय पडसाद उमटणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
वागळे यांनी अजित पवारांबद्दल केले वक्तव्य…!
वागळे यांनी अजित पवारांबद्दल वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीतील २/३ तृतीयांश आमदार अजित पवारांसोबत जातील. जे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसाठी केले आहे, तेच गेली कित्येक वर्षे अजित पवार राष्ट्रवादीसाठी करत आहेत. असे ते म्हणााले आहेत.
अजित पवार हे तोंडाने फाटके आहेत. जे सत्य आहे, तेच ते बोलतात. ते त्यांच्याच मनाचे ऐकतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावानुसार ते नक्कीच राष्ट्रवादीला दणका देतील. पण शरद पवार हळूहळू निष्प्रभ होत जातील. ते एक सांस्कृतिक नेते म्हणून राहतील. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचे योगदान मोठे आहे. परंतु मला असं वाटतं की, जर अजित पवार राष्ट्रवादीबरोबर राहिले तर शरद पवारांनी सर्व राजकारण अजित पवारांच्या हाती सोपवले पाहिजे. शरद पवारांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे आणि उरलेलं आयुष्य मजेने जगलं पाहिजे. कारण एरवी अजित पवार तर त्यांना ऐकणारे नाहीत, असेही मत निखील वागळेंनी यावेळी मांडले.