(Politics News )मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा कालच पार पडली. या सभेत आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे गट तसेच भाजपवर निशाना साधला. तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी देखील जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्याबद्दल आता शिवसेनेच्या आमदाराने मोठा दावा केला आहे. राज्यात काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही हे दिसून येत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये जमत नाही. तर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचं देखील जमत नाही.
अनेक दिवसांच्या ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यानुसार अशोक चव्हाण हे लोकसभेपूर्वी भाजपमध्ये जातील, असा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. शिरसाट यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटणार असे दिसून येत आहे.