Politics News बंगळुरू : कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करत राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर आता काँग्रेसने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यात भाजप सरकारच्या काळात आणलेला धर्मांतरविरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, के. बी. हेडगेवार यांच्याशी संबंधित धडा शाळांच्या अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णयही घेण्यात आला. (Politics News)
काँग्रेस सरकारने के. बी. हेडगेवार यांच्याशी संबंधित धडा शाळांच्या अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत कर्नाटकचे शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी सांगितले की, कर्नाटक मंत्रिमंडळाने शालेय पाठ्यपुस्तकांतील RSS संस्थापक के. बी. हेडगेवार आणि इतरांशी संबंधित प्रकरणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी मागील सरकारने जे काही बदल केले होते, ते आम्ही बदलले आहेत. तर, नेहरूंनी सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांना लिहिलेली पत्रे आणि बीआर आंबेडकर यांच्यावरील कवितांचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
धर्मांतरविरोधी कायदा रद्द
कर्नाटकात धर्मांतर विरोधी कायदा मागील भाजप सरकारने आणला होता. पण हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कायदा व संसदीय कार्यमंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. याशिवाय राज्य मंत्रिमंडळाने शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रार्थनेसह संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.