Politics पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. तसेच पक्षाचे कार्यकर्ते भावनिक झाल्याचे दिसून येत आहे. असे असताना शरद पवारांनंतर पक्षाच्या अध्यक्ष पदी कोण ? असा देखील प्रश्न दुसरीकडे उपस्थित होऊ लागला आहे. असे असताना शरद पवरांच्या अगजदी जवळच्या मित्राने पक्षाच्या अध्यक्षपदी कोण, याचे उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. यावर शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठलशेठ मणियार यांनी मोठे भाष्य केले आहे. पवार यांच्या निर्णयावर मणियार यांनी ‘साम टिव्ही’शी संवाद साधला.
साहेबांना पुन्हा एकदा कॅन्सरचा त्रास झाला. त्यातून ते बरे झाले. तो प्रश्न नव्हता, मात्र, वाढते वय त्यानंतर बदलेली राजकीय परिस्थिती यामुळे त्यांना जो एक ताण योतोय, त्या ताणातून त्यांना आता थोडीशी विश्रांती मिळावी, यासाठी त्यांनी जी सामाजिक कामं उभी केली आहेत. त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. अनेक माणसं त्यांनी राजकारणात उभी केली आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
पवारांचा निर्णय धक्कादायक नाही….
पवार यांनी विचार करुन निर्णय घेतला आहे. हा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक नाही, पण कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक आहे. ते इतर कामांमध्ये स्वता: गुंतवून घेतील. नवीन माणूस तयार होण्यासाठी अधिक वेळ मिळेल. राजकारणामध्ये निवृत्तीची वेळ सांगितली जात नाही. त्यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर चर्चा होणार आहे. मात्र, कधीतरी थांबावे लागणारच आहे, असेही मणियार यांनी सांगितले.
अजित पवारांच्या चर्चांमुळे साहेबांनी निर्णय घेतला का? या प्रश्नावर मणियार म्हणाले, साहेबांनी अनेक धक्कादायक प्रसंग पाहिले आहेत. त्यांनी अनेक प्रसंगाना तोंड दिले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात काय झाले. त्यामुळे ते कोणत्याही प्रसंगात खचत नाहीत, असेही मणियार म्हणाले
तुमच्या भेटीत काही बोलणे झाले होते का? असा प्रश्न विचारला असता मणियार म्हणाले, साहेब आमच्याशी राजकीय विषयावर खूप कमी बोलतात. मात्र, मी त्यांना अनेक वेळा म्हणालो की तुमच्याकडे मोठी टीम आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी सोपवली पाहिजे, असे म्हटले होते.
सुप्रिया सुळे १५ वर्ष खासदार आहेत. त्यांना महाराष्ट्राचा अभ्यास आहे. सामाजिक कामात आणि राजकीय कामात लक्ष घालतात. त्या पक्षाच्या अध्यक्षा होऊ शकतात, पण होतीलच असे मला सांगता येणार नाही, असे सूचक वक्तव्य मणियार यांनी केले आहे.