Politics मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे.(Politics) युती आणि आघाडीतील नेते अंतर्गत मतभेद विसरून तयारीला लागले आहेत. काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये ४८ पैकी २१ जागांवर सकारात्मक वातावरण असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये विदर्भातील १० जागांवर काँग्रेसची परिस्थिती चांगली असल्याचं निरिक्षण नोंदवण्यात आलं आहे.
दरम्यान, विदर्भातील १० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचीही नजर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभानिहाय आढावा बैठक नुकतीच पार पडली. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विदर्भातील १० लोकसभा मतदारसंघांवर चर्चा केली गेली.
एनसीपीने बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, गोंदिया-भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या लोकसभा मतदार संघावर चर्चा केली. एनसीपीने काँग्रेस पक्षाकडील काही लोकसभा मागण्याची तयारी केली आहे, यामध्ये अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वर्धा, रामटेक या जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे मागितल्या जाऊ शकतात.
एनसीपीच्या कार्यकर्त्यांकडून आग्रहाची मागणी आहे की रामटेक, गडचिरोली, बुलढाणा, अमरावती लोकसभा मतदार संघ एनसीपीने लढवावा. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात ठेवूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा केली जाईल, अशी रणनिती बैठकीत ठरवली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विदर्भातील १० जागांचा आढावा घेतला आहे, अशी माहिती दिली आहे.
एकीकडे राष्ट्रवादीकडून विदर्भावर दावा केला जात असताना काँग्रेसनेही १० जागांवर आमची परिस्थिती चांगली असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये विदर्भातल्या नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, अकोला, वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि बुलढाणा या मतदारसंघांचा समावेश आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, शिर्डी, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली आणि मुंबईतील दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम हे २१ मतदारसंघ काँग्रेससाठी सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी विदर्भातल्या जागा लढण्यासाठी इच्छुक असल्यामुळे इथल्या मतदारसंघांवरून महाविकास आघाडीमध्ये खडाखडी होण्याची शक्यता आहे, त्यातच उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.