युनूस तांबोळी
Politics : निवडणूक एका पक्षाकडून लढवायची आणि सत्तेच्या लालसेपोटी पक्षाची तत्त्व, विचारधारा यांना तिलांजली देऊन, दुसऱ्या पक्षाशी परस्पर युती-आघाडी करून, विकासाच्या नावावर सत्ता काबीज करण्याचे राजकारण सध्या सर्रास सुरू आहे. सत्तेच्या राजकारणाच्या या खेळात सर्वसाधारण मतदाराच्या पदरी मात्र निराशाच पडते. जनतेची होणारी ससेहोलपट पाहताना ना कोणाला खेद वाटत ना खंत… आम्ही सत्तेचे वाटेकरी, म्हणजे आम्ही करू ती पूर्व दिशा, असा सत्ताधाऱ्यांचा आवेश; तर आम्ही सत्तेत नाही, निवडणूक आली की मग बघू, अशी बतावणी करत हात झटकणारे विरोधक… वर्षानुवर्षे तेच उमेदवार, सत्ताधारी आणि विरोधकांमधील मिलीभगत यामध्ये नवीन उमेदवारांना संधी कधी मिळणार, हा प्रश्नच उरत नाही. पण, मतदारराजा आता तरी सावध हो. उद्याची हाक ऐक, तुला देखील संधी मिळणार, मतदानाची अन् उमेदवारीचीही हे विसरू नको…
सारे काही सत्तेसाठी…
राज्यात वेगवेगळ्या स्तरावर राजकीय बलाबल तयार करून निवडणूका लढवल्या जातात. यातून खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाते. अर्थात दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत गट-तट तयार करूनच या निवडणुका लढवल्या जातात. ज्याचे मताचे पारडे जड, तो विजयी ठरतो. पण पुढे सत्तेत बसताना मताचे राजकारण सुरू होते. त्यातून मुख्य सत्तेच्या प्रवाहात जाऊन तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या खात्याचे सभापती, पंचायत समिती सभापती, उपसभापती याठिकाणी वेगवेगळ्या खात्यांचे सभापती तर सरपंच, उपसरपंच होऊन ग्रामपंचायतीवर आपल्या हक्काचा माणूस बसविण्याचे काम होते. यासाठी निवडणुकीला सामोरे जावे लागते. (Politics ) आपल्या विचाराचे मतदान घडवून आणावे लागते. त्यासाठी हक्काचे लोक सोबत घेऊन गट तयार करून लढण्याचे सामर्थ्य असावे लागते. या मताच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिक ‘मतदान हे अमूल्य दान’ असे म्हणत मतदान करून मोकळे होतात. राजकारण म्हणजे बिनकामाची झंझट, असे म्हणून सर्वसामान्य जनता मताला मिळणारे आर्थिक बळ घेऊन मोकळे होतात. त्यामुळेच पुढे जाऊन सत्तेसाठी लढणारी माणसे देखील बलाढ्य असणाऱ्यांच्या यादीत सहभागी होते. त्यामुळे जनतेच्या विचाराला आणि विकासाला सत्ताधारी धुडकावून लावतात, असे चित्र पहावयास मिळते. राज्यात तयार झालेली सत्ता ही फक्त सत्तेपासून दूर रहायचे नाही, या उद्देशाने एकत्रित आल्याचे उत्तम उदाहरण आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी केव्हा?
टोमॅटोचे भाव वाढले आणि पाडले देखील. नुकतेच कांद्याचे दर वाढले. अखेर केंद्रसरकारने वाढीव कर व भाजीपाला स्थिर राहण्याच्या उद्देशाने पुन्हा एकदा दर पाडल्याचे दिसून आले. मग आपण पाठविलेले प्रतिनिधी सत्तेत राहून काय करतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला तर नवल ते काय? प्रतिनीधींना निवडून दिले; पण त्याने तुमच्यावर केलेला खर्च वसूल करता करता त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले. हे सर्व जनतेच्या विकासासाठी करत असल्याचा गाजावाजा केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी पुन्हा इच्छुकांच्या यादीत येऊन कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात पंचवार्षिक कधी संपेल, याचीच वाट पहाताना दिसू लागली आहे. (Politics ) आपण मात्र त्याच्या नावाने आरडाओरडा करू लागलो. पण आपल्या विचारात काही बदल होत नाही. तू उभा राहतो की मी… ही चुरस बघताना सर्वसामान्य गरीब घरातला उमेदवार या यादीत येत नसल्याची मोठी खंत आहे. कारखाना, उद्योग अन् व्यवसाय देखील त्याचे मोठ्या प्रमाणात आहेत. असे पाठबळ आपल्याकडे नाही, असे म्हणत सर्वसामान्य जनतेतला उमेदवार म्हणून त्याचीच पुन्हा निवड केली जाते. पण हे कारखाने, उद्योग, व्यवसाय, कार्यकर्ते हे आपल्यातून कमावलेले असतात. हे आपण विसरून जातो. त्यातून उमेदवार म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता पुढे येत नाही.
एकदा तरी संधी द्या…
पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर पुन्हा त्याच मक्तेदारीला आपण मतदान करत असतो. तीन वेळा खासदार, सात वेळा आमदार करून आपण पुन्हा पुन्हा त्याच उमेदवारांना संधी मिळवून देत आहोत, हे तुम्ही विसरत आहात. खरे तर एकदा संधी मिळाल्यावर त्यांनी त्या संधीचे सोने करून घेतलेले असते. बलाढ्य शक्ती निर्माण करून पुन्हा इच्छुकांच्या यादीत त्यांचीच नावे असतात. पुढच्या वेळी जनता आपल्याला निवडून देईल की नाही, याबाबत त्यांच्याही मनात शंका असते. पण वातावरण निर्मिती करून निवडणूक कशी लढवावी आणि मतदारांना भुलभुलैया करण्याचे कसब ते पंचवार्षिक निवडणुकीत शिकलेले असतात. त्यामुळे नव्या उमेदवाराला संधी मिळवून देण्यासाठी योग्य उमेदवाराच्या पाठिशी जनतेने उभे राहिले पाहिजे.(Politics ) योग्य उमदेवाराची निवड केली तर पक्षप्रमुख देखील विचार करतील. एकहाती सत्ता कशी तयार होईल हे पाहणे गरजेचे आहे. यातून विरोधी बाकावर बसणारी मंडळी देखील सत्तेसाठी डळमळीत होणार नाहीत. यासाठी जनतेने नवा चेहरा, योग्य उमेदवार पाहून संधी देणे गरजेचे आहे.
वाद करून प्रसिद्धी…
आर्थिक पाठबळ असल्यावर सत्तेत रहाणे सोपे असल्याचे चित्र या वेळी राज्यात पहायला मिळाले. त्याचाच फायदा घेऊन सर्वसामान्यांच्या विकासासाठी सत्तेत, असे म्हणत सत्ता भोगण्याचे काम होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील तरुणांची बेरोजगारीसाठी होणारी पळापळ सत्ताधाऱ्यांना दिसत नाही. हे एकमेव उदाहरण आहे. कोट्यवधी रूपये शुल्काच्या माध्यमातून गोळा करून परीक्षेच्या वेळी पेपरफुटी, परीक्षांमध्ये अडथळे येतच आहेत. मग एवढा पैसा गोळा केला तो कशावर खर्च करणार, हा प्रश्न तुम्हाला पडत नाही. पकडला तो चोर पण जे पेपरफुटीत पकडले नाहीत, त्यांच्याबाबत काय निर्णय घेणार. १५ ते १८ तास कष्ट करणारे विद्यार्थी पुन्हा पुन्हा परीक्षांना बसून नैराश्येच्या गर्तेत जातात. (Politics ) पण यावर कोणी ठाम निर्णय का घेत नाही. वेगवेगळ्या प्रश्नांवर वाद निर्माण करायचा आणि आपली प्रसिद्धी मिळवायची. असेच धोरण सध्या राजकारण्यांमध्ये आहे. चुकीची विधाने आणि समाज माध्यमातून चुकीचा गैरसमज निर्माण केला की तुमची प्रसिद्धी झालीच समजा. मग एखाद्या नेत्याबाबत टिका-टीपन्नी करताना देखील असेच वाद होताना दिसतात. त्यातून आपली पोळी भाजणारे देखील राजकारण करताना दिसतात.
मग तुम्हीच ठरवा, यापुढे आपल्या विचारांचे नेतृत्व दिले पाहिजे, की घराणेशाही चालवली पाहिजे… जनतेचे भले होईल, त्यालाच मतदान करा. (Politics ) अन्यथा उमेदवार म्हणून तुम्हीच पुढे या. लोकशाहीची कास धरा… बेरोजगारांना काम, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या… कामगारांचा तिढा सोडवा… नव्याने उद्योग व्यवसाय वाढीस लागू द्या… आरोग्य, वीज, पाणी, रस्ते अशा अनेकविध कामांसाठी धोरण तयार करून देश, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव भक्कम बनवा…