Passed Away | मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे नेते, माजी नगरसेवक मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. मनोज संसारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे
गेल्या काही दिवसांपासून मनोज संसारे यांची प्रकृती बिघडली होती. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. झुंजार नेतृत्व हरपल्याने आंबेडकरी समाज शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.
दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती. मनोज संसारे यांची झुंजार नेते म्हणून लोकांमध्ये ओळख होती. संसारे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष’ स्थापन केला होता. मनोज संसारे हे मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक होते. तसेच ‘युथ रिपब्लिकन पार्टी’चे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
मनोज संसारे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पताका खांद्यावर घेऊन अन्यायाविरोधात अग्रेसर भूमिका मांडणारे नेते होते, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संसारेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.