Parliament Attack : नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभा सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत उभ्या असलेल्या दोन अज्ञात इसमांनी सभागृहात उड्या घेतल्या. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत दोन व्यक्तींनी पिवळा धूर निघत असलेले हातात दोन कॅन घेऊन लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावघेतली होती. सध्या ते दोघेही अटकेत आहेत.
खासदारांनीच या दोघांना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण हा धूर जर विषारी असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी प्रतिक्रिया खासदारांनी दिली आहे. तसेच संसदेची नवी इमारत सुरक्षेच्यादृष्टीने इतकी कमकुवत कशी? असाही प्रश्न विरोधी खासदारांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पिठासीन राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली आहे.
दोन अज्ञात इसमांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभा सभागृहात उडी मारली. त्यांच्या हातात कॅन होते. त्यातून पिवळा धूर येत होता. दोघांपैकी एक जण अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. दोघेही काहीतरी घोषणा देत होते. यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. कदाचित हा धूर विषारीही असला असता किंवा स्मोक बॉम्ब असता तर काय झाल असत? विशेष म्हणजो आजच्या दिवशीच १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला झाला होता. त्यामुळे याच दिवशी पुन्हा अशाप्रकारे घुसखोरी होणे, हे खूपच गंभीर आहे.
काँग्रेसचे लोकसभा नेते खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, “दोन लोक प्रेक्षक गॅलरीतून संसदेत उतरले. त्यांच्या हातात दोन कॅन होते, त्यातून धूर निघत होता. आम्ही खासदारांनीच मिळून दोघांनाही पकडले. त्यानंतर सुरक्षा रक्षक आतमध्ये धावत आले. आज सकाळीच आम्ही २००१ च्या हल्लाचे स्मरण करून शहीदांना अभिवादन केले. आज नव्या संसद भवनातही हल्ला झाला. त्यामुळे सुरक्षेत हलगर्जीपणा झाला, हे सत्य आहे.”