बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या बीडच्या परळीतील वैद्यनाथ बँकेतील कोट्यावधींच्या गैरव्यवहार प्रकरणी बँकेला आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे मुख्य मार्गदर्शक आणि खासदार प्रीतम मुंडे या बँकेच्या संचालक आहेत.
वैद्यानाथ बँकेकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शंभूमहादेव कारखाना गहाण होता. कारखान्याने वेळेत कर्ज परत न केल्याने कारखाना लिलावात काढण्यात आला. मात्र, या लिलाव प्रक्रियेत अटी आणि शर्तींचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती.
त्यानंतर बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. कोट्यावधींच्या गैरव्यवहाराच्या आरोप प्रकरणी ही नोटीस २४ जानेवारीला पाठवण्यात आली असून ३१ जानेवारीला कागदपत्रांसह हजर राहून खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.