लहू चव्हाण
Panchgani पाचगणी : कष्टकरी व सर्वसामान्य लोकांना उत्तम आरोग्य सुविधा त्यांच्या कामाच्या वेळेचा विचार करून उपलब्ध करून देण्याचा हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
पाचगणी, (Panchgani)सिद्धार्थनगर येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखान्या’ च्या उद्घाटन प्रसंगी खासदार पाटील बोलत होते. यावेळी वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील, पाचगणी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी गिरीश दापकेकर,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. पी.सी.बुलाख, डाॅक्टर अजित कदम,डाॅ.नयन बरबडे, आरोग्य सहाय्यक संजय चव्हाण, पालिका आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके आदी मान्यवर उपस्थित होते.
कष्टकरी श्रमिकांना अनेकदा आपल्या कामाच्या वेळेत औषधोपचारासाठी दवाखान्यात जाणे शक्य होत नाही, त्यामुळे त्यांच्या कामाच्या वेळेनंतरही त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून या ‘आपला दवाखान्या’ची वेळ दुपारी २ पासून रात्री ८ वाजेपर्यंत लोकांना सुविधाजनक अशी दिलासा देणारी असल्याचे पाटील यांनी सांगितले.
आमदार मकरंद पाटील म्हणाले…!
, सिद्धार्थनगर येथिल गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रकाश गोळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता आज त्यांच्या पाठपुराव्यामुळे सिद्धार्थनगर येथे दवाखाना उभा आहे. ‘आपला दवाखाना’ अंतर्गत बाह्यरुग्ण सेवा, मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार, टेलिकन्सल्टेशन, मल्टी स्पेशालिटी, गर्भवती मातांची तपासणी, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रेसाठी संदर्भ सेवा अशा विविध सात प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहेत.’