नवी दिल्ली : चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर प्रथमच विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक मंगळवारी 19 डिसेंबर रोजी दिल्लीत पार पडत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि संयुक्त जाहिरनामा या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर ही बैठक होणार आहे. त्यामुळे निकालाचे पडसाद ही उमटण्याची शक्यता आहे.
देशातील विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी दिल्लीत होत आहे. मात्र यातील प्रमुख घटक पक्ष काँग्रेसला इतर घटक पक्षांकडून जशा सहकार्याची अपेक्षा होती, तशी मिळताना दिसत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यात यावे, अशी मागणी जेडीयूच्या आमदाराने बैठकीच्या एक दिवसापूर्वी केली आहे.
नितीशकुमार यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा नेता या आघाडीत नसल्याचा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.
नितीशकुमार मंगळवारी चार वाजता बिहारहून दिल्लीसाठी निघणार असल्याची चर्चा आहे. नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवण्याची मागणी या दोन्ही घटनांमुळे काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात अस्वस्थता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशात या बैठकीत नेमके काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बैठकीत कोण होणार सहभागी?
इंडिया आघाडीतील बैठकीला काँग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला, पीडीपीकडून मेहबूबा मुफ्ती, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि आरएलडीचे जयंत चौधरी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
त्याशिवाय अपना दलाकडून (कमेरावादी) कृष्णा पटेल, जेडीयूकडून नितीश कुमार आणि आरजेडीकडून लालन सिंग, लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव, सीपीआयएमएलकडून दीपंकर भट्टाचार्य, सीपीएमकडून सीताराम येचुरी, सीपीआयकडून डी. राजा, तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार हे नेते शिवसेनेचे उद्धव ठाकरे, द्रमुक पक्षाचे एमके स्टॅलिन, मुस्लिम लीगचे कादर मोहिद्दीन आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.