दीपक खिलारे
इंदापूर : भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील निरवांगी येथील ३३/११ केव्ही, २×५ एम.व्ही.ए. वीज उपकेंद्रास विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे.
राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आहे, त्यामुळे फुकटचे श्रेय घेण्याची नेहमीची सवय आता विरोधकांनी बंद करावी, असा टोला इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी विरोधकांना लगावला.
निरवांगी व परिसरातील पाच ते सहा गावांमधील जनता ही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कायम मताधिक्य देत असल्याने विद्यमान लोकप्रतिनिधींनी निरवांगी येथे वीज उपकेंद्र मंजुर होऊ नये म्हणून गेली अडीच वर्षे सतत अडथळे निर्माण केले. मात्र राज्यात शिवसेना-भाजप सरकार आल्यानंतर निरवांगीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन वीज उपकेंद्र मंजूरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून वीज उपकेंद्र मंजूर करून घेतले. या वीज उपकेंद्रासाठी भाजप कडे असलेल्या निरवांगी ग्रामपंचायतीने दोन एकर जागा उपलब्ध करून दिली आहे.मात्र आता शिवसेना-भाजप युती सरकारने वीज उपकेंद्र मंजूर केल्यानंतर त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न लोकप्रतिनिधी करीत आहेत.
हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री असताना सन १९९५ पासून राज्यात सर्वाधिक वीज उपकेंद्रांचे जाळे हे इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण केले, त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने आज वीज पुरवठा होत आहे.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर येऊन सहा महिने झाले आहेत. राज्यातील बाळासाहेबांची शिवसेना-भाजपचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, बहुजन, मागासवर्गीय आदी समाजातील सर्वच घटकांसाठी काम करणारे सरकार आहे.
त्यामुळे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शिवसेना-भाजप युती सरकारने विशेष बाब म्हणून निरवांगी वीज उपकेंद्रास मंजुरी दिली. त्यानुसार महावितरण, प्रकाशगड, मुंबईचे मुख्य अभियंता यांनी दहा दिवसांपूर्वी म्हणजे दि. २६ डिसेंबर २२ ला निरवांगी वीज उपकेंद्रात मंजूरी मिळाल्याचे कळविले आहे.
दरम्यान, लवकरच निविदा निघून वीज उपकेंद्राच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी शिवसेना- भाजप युतीचे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी दिली. निरवांगी ग्रामस्थांनी वीज उपकेंद्र मंजूर केल्याबद्दल शिवसेना-भाजप युती सरकारचे व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे अभिनंदन केले.