नाशिक : एकनाथ शिंदे यांनी बंद केल्यापासून ते ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात धक्के देत आहेत. नाशिक येथील १२ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरे गटाचे १० नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाकडे केवळ १२ नगरसेवक राहिल्याने येथील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या सिडको, सातपूर, नाशिकरोड विभागातील माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. नागपूर अधिवेशनातच हे नगरसेवक पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे ठाकरे गटाची नाशिकमधील ताकद मर्यादित होण्याची चिन्हे दिसत आहेत.
नाशिकमध्ये ठाकरे गटाचे ३४ नगरसेवक होते. पुर्वी १२ नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे नगरसेवकांची संख्या २२ राहिली होती. आता १० नगरसेवक शिंदे गटात गेल्यास ही संख्या थेट १२ वर येवून थांबणार असून शिंदे गटाचे २२ नगरसेवक होणार आहेत.
नाशिक महापालिकेत १३३ सदस्य असून ६७ सभासद भाजपचे आहेत. ठाकरे गटाचे ३४ नगरसेवक असल्याने दुसरा सर्वात मोठा पक्ष होता. पुर्वी गेलेले १२ व आता पक्षप्रवेशासाठी उत्सुक असणारे १० नगरसेवक गेल्यास ठाकरे गटाकडे केवळ १२ नगरसेवक राहणार आहेत. यामुळे सर्वच राजकीय समीकरणे बदलणार आहेत.