मुंबई : देशात नीट पेपर फुटीवरून वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नीट प्रकरणी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. नीट घोटाळाप्रकरणी सरकारने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. या देशातले लाखो विद्यार्थी आज रस्त्यावर आलेत, त्यांचे पालक रस्त्यावर आले आहेत. एक पिढी बरबाद होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री इतर सर्व विषयांवर बोलतात, टीका-टिपण्णी करतात. पण ते पुढे येऊन, ‘नीट’ वर किंवा अन्य राष्ट्रीय परीक्षांच्या घोटाळ्यावर का बोलले नाहीत, असा सवाल लकरत संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
या देशातील प्रमुख विमानतळं ही मोदींच्या मित्रांच्या ताब्यात आहेत. भाजपला अर्थपुरवठा करणाऱ्या गुजरातच्या ठेकेदारांनी देशभरातली विमानतळं बांधली आहेत. फक्तं दिल्लीचं विमानतळ नव्हे तर जबलपुरचं विमानतळ सुद्धा आज कोसळलं. तीन महिन्यांपूर्वीच या विमानतळाचं उद्घाटन झालं होतं. मोदींनी उद्घाटन केलेलं राम मंदिर पहिल्याच पावसामध्ये गळू लागलं. अख्खी अयोध्या पाण्याने तुंबली. १७ हजार कोटी खर्च करून तयार केलेल्या महाराष्ट्रातील अटल सेतूला तडे पडले. जिथे या सरकारच्या वतीने मोदी यांनी हात लावला, तिथे अशुभ घडलंय. मोदींचा अमृत काळ संपला आहे, आता अशुभकाळ सुरू झालाय, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.
देशाचे शिक्षणमंत्री, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवलं पाहिजे. अशी मागणी संजय राऊत यांनी नीट परीक्षा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केली. आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत मागणी केलीय की, आजचं कामकाज थांबवून फक्त नीट घोटाळ्यावर चर्चा करावी. मोदींनी आता त्यावर उत्तर द्यावं, असे राऊत यावेळी म्हणाले.
जर सरकार आडमुठेपणाने वागत असेल तर सरकारला इंडिया आघाडीची ताकद दाखवावी लागणार आहे. लोकसभेत आमची ताकद दुर्लक्षित करता येत नाही. सरकारला काठावर बहुमत आहे. भाजपला लोकसभेत बहुमत नाही. त्यामुळे आम्ही सरकारला लोकसभा आणि राज्यसभेत आम्ही आव्हान उभं करू, असं राऊत यांनी ठामपणे सांगितले.
सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प
सरकारने आधीच अर्थसंकल्प फोडल्याचं चित्र काही वृत्तपत्रात बातम्या आल्या होत्या. अर्थसंकल्प फुटला. कालच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. हे सरकारचं निरोपाचं अधिवेशन असणार आहे. निवडणुकीनंतर हे सरकार दिसणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार आहे. अर्थसंकल्पातल्या घोषणा मोदींनी लोकसभेत केल्या होत्या. तरीही त्यांना राज्यातील जनतेने पराभूत केलं. असेही राऊत यावेळी म्हटले.