उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात १३ पैकी १० ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.
या अविश्वास ठरावावर हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३५ नुसार मंगळवारी (ता. २१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय कोरेगाव मूळ ग्रामपंचायत सदस्यांसाठी विशेष सभा आयोजित केली आहे.
ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास दाखल करताना म्हटले आहे की, विद्यमान सरपंच विठ्ठल शितोळे हे कोरेगाव मूळ ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, तसेच बहुमताने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचे कामकाज करणे, सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतिचे कामकाज करणे, सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. असे या ठरावात म्हटले आहे.
कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वैशाली अमित सावंत, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब यशवंत बोधे, भानुदास खंडेराव जेधे, मंगेश अशोक कानकाटे, सचिन गुलाब निकाळजे, लिलावती बापूसाहेब बोधे, अश्विनी चिंतामणी कड, राधिका संतोष काकडे, मंगल जगन्नाथ पवार, पल्लवी रमेश नाजीरकर, या १० सदस्यांच्या सह्यांचे अविश्वास ठरावाचे पत्र तहसीलदारांना दिले होते.
या अविश्वास ठरावावर तहसीलदार किरण सुरवसे यांनी मंगळवारी (ता. २१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय कोरेगाव मूळ ग्रामपंचायत सदस्यांसाठी विशेष सभा आयोजित केली आहे. या अविश्वास ठरावावर तहसीलदार सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णय होणार आहे.
मंगळवारी अविश्वास ठरावाबाबत काय निर्णय होणार, याकडे कोरेगाव मूळसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.