पुणे : भारतीय जनता पक्षाच्या मिशन बारामती मोहिमेअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बारामती दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल हे बारामती दौऱ्यावर शुक्रवारपासून येणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील विविध विधानसभा मतदार संघांना पटेल भेटी देणार आहेत. अशी माहिती भाजपचे जिल्हा संघटक सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी दिली आहे
पुणे पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात खंडारे यांनी आज बुधवारी (ता.९) वरील माहिती दिली आहे. यावेळी भाजपा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत कोतवाल व राजेंद्र भिंताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नोव्हेंबर अखेरचा आठवडा किंवा डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दुसरा दौरा आयोजित केला आहे. त्याची पूर्वतयारी आतापासूनच सुरु केली आहे.
दरम्यान, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाने राज्यातील काही मतदार संघांवर लक्ष्य केंद्रित असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. असे भाजपचे जिल्हा संघटक सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी सांगितले.