युनूस तांबोळी
पुणे, ता.०५ : राज्यात बेरोजगारांची मुस्कटदाबी होत असून रोजगाराची जाहिरात तिची कोट्यावधीची परिक्षा फी गोळा करण्याकडे वेगवेगळ्या खात्यातून हालचाली होऊ लागल्या आहेत. मात्र परिक्षांची तारीख पुढे ढकलणे, पेपरफुटी, परिक्षांचा निकाल न देणे अशा प्रकारांना बरोजगारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून नोकरीचे कंत्राटीकरण करून शासन बेरोजगांराची फसवणूक होत असल्याने समाजमाध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
तलाठी पदासाठी लाखो विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. त्यातून विभागवार ही परीक्षा घेण्यात आली. सर्वसाधारण विद्यार्थ्यांना 1 हजार व मागासवर्गीयांना ९०० रूपये असे परिक्षा शुल्क देखील आकारले. कोट्यावधी रूपयांची फि गोळा करून देखील परिक्षा केंद्रावर बॅग ठेवण्यासाठी शुल्क आकारण्याचे प्रकार झाले. या परिक्षेत काही ठिकाणी पेपर फुटी झाली तो प्रकार तर वेगळाच. सापडला तो चोर अन नाही सापडला तो हुशार झाला. असे या परिक्षेचे स्वरूप झाले. त्यातून या परिक्षेचा निकाल लागेना. त्यामुळे या पदासाठी बसलेल्या बेरोजगार सुशिक्षीत तरूणांना मार्ग सापडत नसल्याचे दिसून येत आहे.
वनरक्षक पदासाठी परीक्षा झाली. याचा देखील निकाल अजून लागलेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचे निकाल देखील वेळेवर लागत नाही. असे असताना सोशल मिडीयावर नवनव्या जाहिराती येऊ लागल्या आहेत. येथे मात्र रोजगारासाठीच व्यवसाय सुरू झाला असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक जाहिराती मध्ये अॅानलाईन फि आकारली जात आहे. कोट्यावधी रूपयांची फी गोळा करून बेरोजगार तरूणांना नोकरीचे आमिष दाखविले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी शासनाने विशेष लक्ष देऊन परिक्षा शुल्क आकारू नये. असा आदेश काढणे अपेक्षीत आहे. त्यातून बेरोजगारांची होणारी आर्थीक लुट थांबेल.
राज्याच्या आरोग्य विभागा मार्फत वर्ग क व ड च्या परिक्षा 2021 मध्ये स्थगित करण्यात आल्या. या माध्यमातून शंभर कोटी पेक्षा जास्त जमा झालेले परिक्षा शुल्काचे काय ? असा प्रश्न बेरोजगार तरूण विचारत आहेत. गेल्या महिण्यात राज्याच्या सार्वजनीक आरोग्य विभागामार्फत पुन्हा जाहिरात आली. या परिक्षेसाठी 10949 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यासाठी आत्तापर्यत सव्वादोन लाख उमेदवांरी अर्ज केले. मात्र या परिक्षेची तारिख अजूनही जाहिर झाली नाही. या परिक्षेच्या माध्यमातून 22 कोटी परिक्षा शुल्क जमा झाले आहे. यासाठी परिक्षा कधी होणार हे अजूनही निश्चित झाले नाही.
कोट्यावधी रूपयांचे परिक्षा शुल्क जमा करूनही खाजगी संस्थाना या परिक्षेत पारदर्शकता आणता येत नाही. परीक्षे दरम्यान पेपर फुटणे, पेपर उशीरा मिळणे, बैठक व्यवस्था नसणे, पेपर न मिळणे असे प्रकार घडतात. त्याला केव्हा आळा बसणार असे सुशिक्षीत बेरोजगार तरूण विचारू लागले आहेत.
उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परिक्षांसाठी तास न तास अभ्यास करून परिक्षांना सामोरे जाणारे तरूणांची संख्या मोठी आहे. खाजगी क्लासेस च्या माध्यमातून ओतावी लागणारी फी आणि परिक्षा शुल्क साठी आर्थीक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पण त्यातूनही परिक्षा रखडलेली असते. परिक्षांचे निकाल लागत नाही. असे प्रकार घडत असल्याने तरूणांना नोकरीची शाश्वती राहिली नाही.