New Delhi : नवी दिल्ली : शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्षांकडून विलंब होत होता. या प्रकरणी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. दरम्यान, आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली असून, १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना दोन आठवड्यांची मुदत आज सुप्रीम कोर्टाने दिली आहे.
दोन आठवड्यात मत मांडावे लागणार
या निर्णयामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दोन आठवड्यात त्यांचे मत मांडावे लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने तशी नोटीस बजावली आहे, अशी माहिती सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली. (New Delhi) या पार्श्वभूमीवर आमदार निलंबनाचा निर्णय अजूनही लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण दोन आठवड्यात फक्त उत्तर द्या, असं कोर्टाने अध्यक्षांना सांगितलं आहे. त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय उत्तर देणार, याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मागील एक वर्षांपासून तिढा कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत असताना शिंदेंसह शिवसेनेच्या १६आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचे स्पष्ट केले. तसेच यावर त्यांनी पुरेशा वेळात यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (New Delhi) परंतु, कोर्टाच्या निकालाला ३ महिने उलटून गेले तरीही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
दरम्यान सुप्रीम आजच्या कोर्टाच्या निर्णयानंतर उल्हाट बापट म्हणाले की, आपल्या लोकशाहीचं दुर्देव आहे. त्याचबरोबर राजकीय मॅच्युरिटी नसल्यामुळे प्रत्येकवेळी आपल्याला सुप्रीम कोर्टात जावे लागते. (New Delhi) आपला वेळ यात वाया जातो. हा जो निर्णय आहे, त्यामध्ये कसल्याही प्रकारची अतिरिक्त समन्वय परिस्थिती नाही. दोन महिन्यांत स्पीकरने निर्णय घेणे अपेक्षित होते, हे राज्यघटनेच्या दुष्टीने चुकीचे आहे.
आता येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलू शकतात. तसेच एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद देखील जाऊ शकते. (New Delhi) त्यादृष्टीने राहुल नार्वेकर यांची प्रत्येक भूमिका आणि कृती आता महत्त्वाची ठरणार आहे.