पुणे : देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याबद्दल पुण्यात डमी राज्यपाल उभा करून भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहर राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात सारसबाग जवळील सावरकर पुतळा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रवक्ता प्रदीप देशमुख, संतोष नांगरे, माजी नगरसेविका प्रिया गदादे, किशोर कांबळे, वनराज आंदेकर, महेश शिंदे, बाबा पटील, महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, श्वेता होनराव, पार्थ मिठकरी, गणेश मोहीते, मनाली भिलारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी ‘भगतसिंग कोश्यारी नही चलेंगी होशीयारी’, ‘काळी टोपी काळे मन, हेच भाजपचे अंतरमन’, ‘भाज्यपाल हटावो महाराष्ट्र बचावो’, ‘सुधांशु त्रिवेदींचा धिक्कार असो’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच छत्रपती महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, राज्यपाल पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, लोकभावना याबाबत आदर बाळगणे अपेक्षित असते. परंतु, विद्यमान राज्यपाल वारंवार महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्वांबाबत अवमानास्पद वक्तव्ये करीत आहेत. ही अतिशय गंभीर तसेच संतापजनक बाब आहे.
यावेळी बोलताना प्रदीप देशमुख म्हणाले, सत्तेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांचे तळवे चाटण्याची ही अतिशय लाचार प्रवृत्ती आहे. असा कोणताही स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही. आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांचा निषेध करीत आहे, असे सांगितले.